Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Satara › ‘जिहे-कटापूर’ डिसेंबरअखेर पूर्ण करणारच

‘जिहे-कटापूर’ डिसेंबरअखेर पूर्ण करणारच

Published On: May 26 2018 10:32PM | Last Updated: May 26 2018 10:15PMकोरेगाव : प्रतिनिधी

खटाव तालुक्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी अतिशय महत्त्वाची असलेली जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्याचा निर्धार भाजप सरकारने केला आहे. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेबरोबरच भरीव निधीदेखील उपलब्ध करुन दिला आहे. गेले अनेक महिने रखडलेले काम या 8-9 महिन्यांत प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन व महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी योजनेच्या कामाकडे जातीने लक्ष दिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2018 पर्यंत योजनेचे काम पूर्ण होऊन खटाव तालुक्यात पाणी येईलच, असा विश्‍वास भाजपचे युवा नेते महेश शिंदे यांनी व्यक्त केला. 

खटाव तालुक्यातील जनतेला जिहे-कटापूर योजनेची खरी परिस्थिती समजावी या हेतूने महेश शिंदे यांच्या पुढाकाराने पुसेगाव, खातगुण, भांडेवाडी, खटाव, जाखणगाव, नेर, निढळ, कटगुण, विसापूर, बुध, ललगुण, दरुज, दरजाई व जांब येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. गोडसेवाडी येथील पंप हाऊसवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या शिंदे बोलत होते. त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी भरत मुळे, निलेश नलवडे, रमेश उबाळे, रणधीर जाधव, संतोष जाधव, राहुल बर्गे, अभयराजे घाटगे, पोपट भराडे, रोहन देशमुख, अ‍ॅड. रोहित कांबळे, प्रदीप देशमुख, निलेश जाधव आदी उपस्थित होते. 

महेश शिंदे म्हणाले, खटाव तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. भाजपला रोखण्यासाठी विघातक शक्ती आणि विकावू प्रवृत्ती स्वार्थासाठी एकत्रित आल्या आहेत. गेले दोन दिवस अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. बोरीचा बार भरवून ते जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिहे -कठापूर योजनेचे नाव घेऊन विरोधक राजकीय भांडवल करु पाहत आहेत. प्रत्यक्षात योजनेचे काम कसे सुरु आहे. कार्यस्थळावर काय परिस्थिती आहे, हे खटाव तालुक्यातील जनतेला कळावे, या हेतूने प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. प्रत्यक्षात सुरु असलेले काम सर्वांनी पाहिले. तेथील अधिकारी व कंत्राटदारांच्या प्रतिनिधीकडून सर्वंकष माहिती घेतली आहे. ते आता आपल्या गावात जाऊन सांगतील. मोबाईलमधील फोटो, व्हिडीओ शूटिंग दाखवतील आणि जनतेला खरे काय आहे, हे समजेल, असेही शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु 

लक्ष्मणराव इनामदार यांच्या कर्मभूमीतील हा प्रकल्प असल्याने त्यांनी या योजनेच्या कामामध्ये व्यक्तीगत लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी जाखणगाव येथे झालेल्या सभेत या योजनेला निधी कमी पडू देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी बोलल्याप्रमाणे कृती करुन दाखविली आहे. जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन व महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी योजनेला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनीदेखील विशेष सहकार्य केले आहे. योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शासनाकडून निधी उपलब्ध झालेला असून, सद्य:स्थितीत बंधार्‍याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तिन्ही पंप हाऊसचे काम पूर्णत्वाकडे असून केवळ स्विच यार्डचे काम राहिलेले आहे. वर्धनगड येथील बोगद्याचे कामदेखील झाले असून डिसेंबर महिन्यापर्यंत योजना कार्यान्वित होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.