Sun, May 26, 2019 00:45होमपेज › Satara › कालव्यात जीप पडून तीन ठार; ६ जखमी

कालव्यात जीप पडून तीन ठार; ६ जखमी

Published On: Jun 11 2018 8:03PM | Last Updated: Jun 11 2018 8:03PMनिरा : वार्ताहर

लोणंद-नीरा रस्त्यावरील पाडेगावच्या हद्दीत कालव्यात जीप पडून तीन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. महेश जगन्‍नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (4 , दोघे  रा. बल्लाळवाडी) आणि सृष्टी संतोष साळुंखे (9, रा. दावलेवाडी) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबातची माहिती अशी की, माण तालुक्यातील वावरहिरे येथील साळुंखे आणि बल्लाळ हे दोन कुटुंबीय भाग्यश्री टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जीपमधून (एमएच 42 क्यू 574) रविवारी (दि. 10) मुंबईला निघाले होते. त्यांनी लोणंदच्या पुढे एका ढाब्यावर जेवण केले. यावेळी चालक महेश बल्लाळ याने मद्यप्राशन केले. पाडेगावजवळील कालव्याच्या वळणावर रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास चालक महेश याचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप कालव्यामध्ये गेली. पाण्याच्या वेगाने जीप पाण्यातच एका बाजूला उभी राहिली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर कालव्याजवळील पाडेगाव येथील नवले कुटुंबातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान एका आरोपीच्या शोधात असलेले लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ निखिल नवले, रोहित नवले, कॉ. अविनाश शिंदे, कॉ. रोहित गायकवाड यांनी पाण्यात उड्या मारून जीपमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने  बाहेर काढले आणि त्यांना लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, यामध्ये चालक महेश व दोघे मृत्युमुखी पडले.