Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Satara › कालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता 

कालव्यात जीप कोसळली; एक बेपत्ता 

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:20PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

महाड-पंढरपूर मार्गावर कोळकी, ता. फलटणच्या हद्दीत बुधवारी रात्री महाबळेश्‍वरहून नांदेडकडे निघालेली जीप चालकाचा ताबा सुटल्याने नीरा उजवा कालव्यात पडून बुडाली. गाडीतील 6 जण पोहून बाहेर आल्यामुळे बचावले, तर एक जण बेपत्ता झाला आहे. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. हे सर्व युवक पुणे येथे भरतीसाठी आले होते. ते काही कामानिमित्त महाबळेश्‍वरला गेले होते.

याबाबत माहिती अशी, चालक बालाजी अनिल राठोड (वय 23, रा. दत्तमांजरी, ता. माहुर, जि. नांदेड) हे दि. 13 रोजी आपली जीप (एमएच 26 एएफ 2852) घेऊन महाबळेश्‍वरहून नांदेडला निघाले होते. यावेळी सहा युवकांनी त्यांना नांदेडपर्यंत घेऊन जाण्याची विनंती केली. हे युवक सैन्य भरतीसाठी पुण्याला आले होते व काही कामानिमित्त महाबळेश्‍वरला गेले होते. राठोड या जीपचालकाने सिद्धार्थ देवराव आरके (वय 22, रा. दत्तमांजरी), प्रफुल्ल दारासिंग राठोड (वय 23, रा. वझरा, ता. माहुर), शत्रुघ्न रामाराव चांदेकर (वय 22, रा. वझरा), मारुती संभाजी शेंबटेवाड (वय 25, रा. खराटवाडी, ता. हदगाव), कचरू दत्ता गिरेवाड (वय 24, रा. चितगिरी, ता. भोकर) यांना गाडीत घेतले व महाबळेश्‍वरमधून रात्री 10 वाजता माहुर (नांदेड)कडे जाण्यासाठी ते निघाले. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातून नातेपुतेकडे जाणार्‍या मार्गावरील नीरा उजवा कालव्यावरील राऊ रामोशी पुलावर चालक बालाजी राठोड यांचा गाडीवरील ताबा सुटला. पुलाला कठडा नसल्याने जीप रस्ता सोडून कालव्याच्या भरावावरुन वाहत्या पाण्यात बुडाली. 

गाडी पाण्यात कोसळताच चालक व सिद्धार्थ आरके, रामेश्‍वर पवार, प्रफुल्ल राठोड, शत्रुघ्न चांदेकर, मारुती शेंबटेवाड असे 6 जण पोहून कालव्याच्या काठावर पोहोचले. मात्र, कचरु दत्ता गिरेवाड हा कोठेच दिसला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळून आला नाही. तो पाण्यातून बाहेर येवून निघून गेला की पाण्याबरोबर वाहून गेला, याबाबत निश्‍चित सांगता येत नसल्याचे बालाजी राठोड याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी कालव्याच्या पाण्यात उड्या मारुन वाहून गेलेल्या गिरेवाड यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पाण्यातील जीप बाहेर काढण्यात आली. या जीपमध्येही कचरु गिरेवाड आढळून आले नाहीत.