Mon, Apr 22, 2019 12:35होमपेज › Satara › जयवंतराव भोसले सार्वजनिक जीवनाचे भूषण

जयवंतराव भोसले सार्वजनिक जीवनाचे भूषण

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:37PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

स्व. जयवंतराव भोसले यांचे व्यक्तित्व आणि कृतित्व पाहिल्यानंतर आपणास ते संपूर्ण राज्याच्या सार्वजनिक जीवनाचे भूषण वाटते, असे गौरवोद्गार उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी काढले. तसेच स्व. भोसले यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत संपूर्ण परिसराचा कायापालट करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी डॉ. अतुल भोसले यांना केले.

स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण, भगीरथ या ग्रंथाचे प्रकाशन आणि स्व. जयवंतराव भोसले म्युझियमचे लोकार्पण राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आ. पतंगराव कदम, आ. दिलीपराव देशमुख, आ. शिवाजीराव नाईक, आण्णासाहेब डांगे, माजी आ. भगवानराव साळुंखे, रघुनाथराजे नाईक - निंबाळकर, कृष्णेचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, शिवाजीराव मोहिते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल नाईक म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले यांच्यासोबत आपण 1980 ते 1982 या कालावधीत काम केले आहे. विधानपरिषदेत आमदार म्हणून काम करताना त्यांनी एक अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली होती. मीही कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यावेळी कराडची जंगलासारखी अवस्था होती. मात्र, आता कराडचे ‘मंगल’ झाले आहे. कराडात त्यांनी विकासाची गंगा आणण्यासाठी भगिरथ प्रयत्न केले आहेत. त्यांच्या जीवनचरित्रावरील भगिरथ हा ग्रंथ त्यामुळेच प्रत्येकाने वाचला पाहिजे. संघर्षातून प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत दाखवून देत त्यांनी विकासाची गंगा आणली आहे. म्हणूनच प्रत्येकाने त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे असे आवाहन राज्यपाल राम नाईक यांनी यावेळी केले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांना विठ्ठल रूक्मिणी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. आज संस्कृती, परंपरा जपण्याची गरज आहे. त्यासाठी संत विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे. त्याद्वारे संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर यांच्यासारख्या आपल्या सर्व संतांची माहिती संपूर्ण जगाला होईल. सर्व भाषेत संतांचे कार्य, साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे मतही डॉ. भोसले यांनी व्यक्त केले. तसेच सलग 22 वर्ष जयवंतराव भोसले यांनी राज्यात अव्वल क्रंमाकाचा दर शेतकर्‍यांना दिला. शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

आ. दिलीपराव देशमुख म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले हे ध्येयवेडे कर्मयोगी होते. त्यांनी अनेकांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असेच आहे, असेही आ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी आण्णासाहेब डांगे, आ. पतंगराव कदम, मदनराव मोहिते, आ. शिवाजीराव नाईक यांचीही भाषणे झाली. कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आभार मानले.

आमच्यावेळी तसे होत नव्हते...

राज्यपाल राम नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांना का राजीनामा द्यावा लागला होता? हे सांगितले. मात्र त्यानंतरही आमची मैत्री कायम होती. आता वेलमध्ये जाण्यासारखे प्रकार त्यावेळी होत नसत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.