Thu, Jul 18, 2019 00:24होमपेज › Satara › नव्या निवडींबाबत आ. शिवेंद्रराजे भोसले शब्द पाळणार का?

जावलीत सभापती-उपसभापती निवडीचे वारे

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:10PMसातारा : प्रतिनिधी

पंचायत समिती निवडणुकांनंतर झालेल्या  सभापती, उपसभापती निवडीला येत्या 14 जूनला सव्वा वर्ष पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये नव्या निवडीबाबत उत्सुकता असून जावली तालुक्यातही या निवडींबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. जावलीच्या राजकीय पटलावर सभापती, उपसभापती बदलाचे वारे घोंघावत आहेत. आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा शब्द प्रमाण मानून गतवेळच्या निवडी झाल्या असून त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द नव्या निवडीवेळी पाळला जाणार का? याचीच तालुक्यात चर्चा सुरू आहे. 

जावली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावलीत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादीने एकहाती जिंकल्या. त्यानंतर झालेल्या सभापती निवडीवेळी जावलीतून अनेकजण इच्छुक होते. मात्र, आ. शिवेंद्रराजे यांनी स्वत: लक्ष घालून हा तिढा सोडवला होता. त्यामुळे सभापतीपदी म्हसवे गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. अरूणा शिर्के यांची वर्णी लागली तर खर्शी बारामुरेमधून निवडून आलेले दत्ता गावडे यांची उपसभापती निवड झाली. या दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आ. शिवेंद्रराजे यांचे कसब कामी आले होते. मात्र, या दोन्ही निवडी सव्वा सव्वा वर्ष करण्यात आल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. आता सव्वा वर्षाचा हा कालावधी येत्या 14 जूनला पूर्ण होत आहे.  गतवेळी सामंजस्याने व बिनविरोध निवडी करणार्‍या आ. शिवेंद्रराजे भोसले यांना यावेळी निवडीचा मार्ग सुकर होणार आहे. 

गतवेळी निवडी करताना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या काही घडामोडी घडल्या त्यातून मार्ग काढत पुढील सव्वा वर्षे दुसर्‍या टीमला संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे  सव्वा वर्षाचा कालावधी आता पूर्ण झाल्यानंतर नव्याने खांदेपालट होणार आहे. त्यानुसार सभापती, उपसभापती यांची वर्णी लागणार आहे. कारखाना गटही नव्या निवडीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे या निवडींबाबत तालुक्यात उत्कंठा लागून राहिली आहे.