Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Satara › ‘जलयुक्‍त शिवार’ झाली लोकचळवळ

‘जलयुक्‍त शिवार’ झाली लोकचळवळ

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:43PMसातारा : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार ही योजना आता योजना राहिली नसून एक चळवळ बनली आहे. या चळवळीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षण करुनच योग्य ती पिके घ्यावीत. पाणी जपून वापरने ही काळाची गरज बनली आहे. याची जाणीव आता सर्वसामान्यांना होत आहे. ती अधिक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय व जलसंधारण विभागाच्यावतीने अनपटवाडी ता. कोरेगाव येथील जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची व जिहे-कठापूर योजनेची पाहणी करण्यासाठी पत्रकार दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. दौर्‍यानंतर उपस्थित पत्रकारांशी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी शासकीय विश्रामगृहात संवाद साधाला. यावेळी अधिक्षक अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार अस्मिता पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, तालुका कृषी अधिकारी एस.बी. साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकांनी एकतेच्या जोरावर जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे गावांना शाश्‍वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या पिकांना जास्त पाणी लागते अशी पिके घेऊ नयेत. जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे यामुळे माणदेशचा पूर्ण भाग पाणीदार होईल, असा विश्‍वासही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी व्यक्त केला.

पाणीदार अनटपवाडी

अनपटवाडी हे गाव कोरेगाव तालुक्यात आहेत. या गावाचा सन 2015-16 मध्ये जयलुक्त शिवार अभियानात समावेश करण्यात आला. लोकसभागातून या गावात जलसंधारणाची अत्यंत चांगली कामे झाली असून त्याचे दृष्य परिणाम आज दिसत आहेत. दुष्काळाला कंटाळून रोजगारासाठी बाहेरे गेलेले लोकही आज गावात येवून चांगली शेती करत आहेत. हे  यश जलसंधारणांच्या कामांमुळे आणि लोकांच्या संयुक्त कामांमुळे या गावातील लोकांमध्ये सकारात्मक बदल झाले असून यापुढेही अशीच जलसंधारणाची कामे करत राहणार असल्याचेही येथील गावकर्‍यांनी यावेळी सांगितले.

जिहे-कठापूर योजनेचे 80 टक्के काम पूर्ण

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत कृष्णा नदीतील 3.17 टी.एम.सी. पाणी तीन टप्प्यामध्ये उचलून जिल्ह्यातील खटाव व माण तालुक्यातील 27 हजार 500 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

या योजनेसाठी टप्पा क्र.1, 2,3 मध्ये 6 पंप, टप्पा क्र.4 नेर उपसा 2 पंप व टप्पा क्र.5 नेर उपसा येथे 4 पंप बसविण्यात येणार आहेत. यामुळे खटाव तालुक्यातील 11 हजार 700 हेक्टर व माण तालुक्यातील 15 हजार 800 असे एकूण 27 हजार 500 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता 1085.53 कोटी असून जानेवारी 2018 अखरे 399.13 कोटी खर्च करण्यात आले आहेत तर सन 2017-18 साठी 20 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यावेळी अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कार्यकारी संजय बोडके यांनी पत्रकारांना या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली.