Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Satara › घरात केले जलयुक्‍त शिवारचे आराखडे

घरात केले जलयुक्‍त शिवारचे आराखडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर

ग्रामसभेतील चर्चेनंतर जलयुक्‍त शिवार अभियानाचे आराखडे तयार करणे आवश्यक असतानाही ते घरी बसूनच करण्यात आल्याचा दावा अजित मोहिते यांनी केला आहे. ढेबेवाडी विभागात हा प्रकार घडल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र समितीकडून सखोल चौकशी व्हावी. तसेच ही शासनाची फसवणूक असून दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

‘टंचाईमुक्‍त महाराष्ट्र 2019’ या अंतर्गत टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाढी जलयुक्‍त शिवार अभियान ही योजना अस्तित्वात आणली गेली आहे. जी गावे या योजनेच्या निकषात बसतील, अशा गावांना या योजनेतून टंचाई मुक्‍त करण्याचे धोरण शासनामार्फत राबवण्यात येत आहे. त्यानुसार सन 2017-18 चा जलयुक्‍त शिवार अभियानाचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार केला. 

मात्र, हा आराखडा तयार करताना कोणालाही विश्‍वासात घेण्यात आले नाही. वास्तविक पाहता हा आराखडा तयार करताना गावातील लोकप्रतीनिधी, शेतीमित्र, सरपंच, महिला प्रतिनिधी यापैकी तीन सदस्य व कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक असे मिळून पाच जणांची समिती करणे आवश्यक होते. तसेच 2 ऑक्टोंबरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांना विचारात घेऊन या कामाचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, असे असूनही  जिती, काळगांव, डाकेवाडी, सुतारवाडी, भिलारवाडी, सळवे, पाळशी, उधवणे यासह इतर गांवामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी फिरकले देखील नाहीत. तसेच याबाबतचे कोणतेही ठराव घेतले नाहीत. रूवले गावांत दुसर्‍या सजातील कृषी सहाय्यक उपस्थित होते. भोसगाव आणि कारळे या गावात निवडणूक आचारसंहिता असलेने ग्रामसभाच झाली नाही. कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घरी बसूनच कागदोपत्री आराखडे तयार करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे धाडस केल्याचा खळबळजनक दावाही मोहिते यांनी केला आहे.

दोषी कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी, म्हणून या सर्व बाबींची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच दोषींना निलंबित करून प्रसंगी फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पुणे विभागीय आयुक्त, सचिव जलसंधारण मंत्रालय मुंबई, कृषी आयुक्त पुणे, आ. जयकुमार गोरे यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

 

Tags : satara, satara news, Jalyukt Shivar Abhiyan, Plans, prepared, 


  •