Wed, May 27, 2020 09:01होमपेज › Satara › सातारा : जावळीकरांना कोरोनाची भीती आहे की नाही? 

सातारा : जावळीकरांना कोरोनाची भीती आहे की नाही? 

Last Updated: Mar 23 2020 7:42PM

मेढा येथील बाजारपेठेत झालेली गर्दीकुडाळ : पुढारी वृत्तसेवा 

जावळी तालुक्याची ओळख म्हणून मेढा येथील बाजारपेठेकडे पाहिले जाते. येथे कोरोना पसरू नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र कलम १४४ लागू असताना देखील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रत्येक दुकानाच्या समोर प्रचंड गर्दी झालेली आहे. यामुळे जावळीकरांना कोरोनाची भीती आहे की नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात कलम १४४ लागू असतानाही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. तसेच यावेळी दुकानासमोर कोणीही गर्दी करू नये असेही आदेश देत मोजक्याच लोकांना दुकानात घ्यावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र येथील दुकानदारांनी कोणतेही नियम पाळलेले नाहीत. एकेक दुकानांमध्ये ५० ते ६० लोकांची गर्दी आहे. दुकानदार आपला माल विकत आहेत. तसेच हे दुकानदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली देत आहे. त्यामुळे गर्दी जमा करून माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना पाचपेक्षा अधिक व्यक्ती एका जागेवर  गोळा होऊ शकत नाही. जर एका जागेवर पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमा होत असतील तर कलम १४४ कलमान्वये कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.   

सोमवारच्या आठवडी बाजारात चौकाचौकात घोळके 

जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना मेढा येथे बाजारात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला कोलदांडा देत लोक चौकाचौकात घोळके करून बाजार घेताना दिसून आले. तर बाजारात जमलेली गर्दी लक्षात घेता जावळीकरांना कोरोनाची भीती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दुकानावर मुंबई चाकरमानीच 

मेढा येथील बाजारात मुंबई वरून आलेले चाकरमानीच जास्त दिसत होते. जणू पुन्हा कधी किराणा व भाजी मिळणारच नाही असे गृहीत धरत त्यांनी दुकानावर एकच गर्दी केली होती.   

ग्रामीण भागात रोग पसरूनच शांत बसणार की काय? 

कोरोना व्हायरस हा गर्दीतूनच सगळीकडे प्रसरतो हे मुंबईवरून आलेले चाकरमान्यांना कोण सांगणार? गर्दी करू नका असे सांगूनही हे गर्दी करत आहेत. तर ग्रामीण भागात रोग पसरूनच हे शांत बसणार की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

आधीच प्रशासनाने ठणकावून सांगितले होते 

जीवनावश्यक वस्तू म्हणून दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे काणीही गर्दी करू नका असे जमा होणाऱ्या गर्दीला तहसिलदार शरद पाटील आणि मेढा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र ते निघून गेल्यानंतर पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.  

प्रशासनाने कारवाई करण्याची गरज 

ग्रामीण भागात पुण्या-मुंबईवरुन आलेले चाकरमानी हे संपूर्ण कुटुंबासह आले आहेत. त्यामुळे ते मेढा येथील बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कलम १४४ तोडून त्याचा भंग करून विनाकारण गर्दी करत आहेत. ते कोरोना वाढीला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे पुन्हा जर गर्दी झाली तर प्रशासनाकडून कारवाई होण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात होणारा मोठा अनर्थ ठळण्यास मदत होईल.