होमपेज › Satara › ओमकार व आकाशवर अंत्यसंस्कार

ओमकार व आकाशवर अंत्यसंस्कार

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:15PMकराड : प्रतिनिधी 

सैदापूर ता. कराड येथे ध्वज लावत असताना लोखंडी पाईपला वीज वाहक तारांचा स्पर्श होवून विजेच्या जबर धक्क्याने शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते  ओमकार माने व आकाश ढवळे यांचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याबाबतची नोंद शहर पोलिसात झाली आहे. ओमकार उत्तमराव माने (वय 30 रा. शुक्रवार पेठ) व आकाश मोहन ढवळे (वय 25 रा. बुधवार पेठ) हे दोघेही शिवप्रतिष्ठानचे सक्रीय कार्यकर्ते होते. 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,  सैदापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या तयारीसाठी ओमकार व आकाश तेथे गेले होते. या कार्यक्रमासाठी ध्वज लावण्याचे काम त्यांच्याकडे होते. ध्वज लावण्यासाठी लोखंडी मोठी पाईप आणली होती. ज्या ठिकाणी ध्वज उभा केला जाणार होता त्या ठिकाणी बांधकाम करून चार फूट पाईप बसविण्यात आली होती. त्यावर उंच लोखंडी पाईप उभा करून ध्वज लावण्यात येणार होता. ही पाईप उभी करत असताना तिचा स्पर्श नजीक असणार्‍या वीज वाहक तारांना झाला. 

वीज प्रवाह लोखडी पाईपमधून पास झाला. ओमकार व आकाशला जबर शॉक बसला. ते जागेवरच कोसळले. तर अन्य एक जखमी झाला. युवकांनी त्यांना तात्काळ कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पाईप ज्या दिशेला कलली तेथे विजेच्या तारा होत्या. अंधारामुळे त्या तारांचा दोघांना अंदाज आला नाही त्यामुळे दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. 

ओमकार व आकाश दोघेही सामान्य कुटुंबातील आहेत. ओमकार येथील शुक्रवार पेठेत राहतो. तो स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होता. त्याच्या जाण्याचा मोठा आघात त्याच्या कुटुंबावर झाला आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील व तीन बहिणी आहेत. 

आकाशच्या पश्‍चात आई, वडील व एक भाऊ आहे. तो खासगी ठिकाणी नोकरी करत होता. या घटनेची नोंद काल रात्री उशिरा शहर पोलिसात झाली आहे. हवालदार साबळे तपास करत आहेत.