Sun, May 26, 2019 11:28होमपेज › Satara › दरोडा, खुनाचा ४ दिवसांत छडा

दरोडा, खुनाचा ४ दिवसांत छडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

उंब्रज (ता. कराड) येथे दि. 21 नोव्हेंबर रोजी सशस्त्र दरोडा टाकून वृद्ध महिला जैबुन मुल्‍ला यांचा खून करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व उंब्रज पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सीसीटीव्ही फुटेज, दरोड्याची पद्धत यावरून टोळीचा छडा लागला आहे. 

अटक केलेल्या संशयित दरोडेखोरांमध्ये शशिकांत दप्तर्‍या भोसले, अतुल दप्तर्‍या भोसले (दोघे रा. वडघुल, ता. श्रीगोंदा), देवराम घोगरे (रा. महाडुळवाडी, मांडवगण, ता. श्रीगोंदा), दर्शन ऊर्फ अरुण दशरथ चव्हाण (रा. पद्मपूरवाडी, ता. नगर) यांचा समावेश आहे. दरोडेखोरांनी खून करून 49 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले होते. या टोळीमध्ये आणखी दोघांचा समावेश असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

तपासाबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, दि. 21 रोजी दरोडेखोरांच्या एका टोळीने उंब्रजसह परिसरात अक्षरश: धुडगूस घातला होता. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज येथे जैबुन मुल्‍ला (वय 86) यांचा दरोडेखोरांनी निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतरही या दरोडेखोरांनी परिसरात घुडगूस घातला होता. मसूर येथील घटनेत दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैदही झाले होते.

या घटनेच्या तपासासाठी श्रीगोंदा परिसरात दोन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या सातार्‍याच्या पथकाने सुरुवातीला दरोडा टाकण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा चालक देवराम घोगरे यास  ताब्यात घेतले. त्याने 21 नोव्हेंबर रोजी रात्रीच आरोपींसमवेत उंब्रज येथे गेल्याची कबुली दिली. ‘रात्री दरोडेखोरांना उंब्रज येथे सोडून आपण काही अंतरावर असणार्‍या लॉजवर जाऊन  थांबलो. पहाटेच्या दरम्यान फोन आल्यानंतर आपण त्यांना घेऊन देवदर्शनासाठी गेलो. 22 रोजी संध्याकाळी परत गावी आलो’, असे त्याने पोलिसांना सांगितले.

या गुन्ह्याचा मास्टरमाइंड शशिकांत भोसले हा गुंडेगाव (ता. नगर) येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने तेेथे सापळा रचला. पोलिस कर्मचारी ढवळे व चव्हाण यांना या भागाची पुरेपूर माहिती असल्याने त्यांनी दुचाकीवर जाऊन संशयित आरोपी भोसले याचा शोध घेतला. काही वेळानंतर आरोपी भोसले हा भैरवनाथ मंदिराच्या बाजूला आल्याचे लक्षात येताच, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पळून जाऊ लागला. सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. आणखी एक आरोपी भोसले यालाही गुंडेगाव येथूनच, तर दर्शन चव्हाण याला पद्मपूरवाडी येथून पकडण्यात आले. दरम्यान, अद्याप कोणताही मुद्देमाल जप्‍त झालेला नाही.

टोळीवर ‘मोक्‍का’अंतर्गत कारवाई करणार...

उंब्रज दरोडा व खून प्रकरणातील टोळी क्रूर असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली असून, या टोळीला मोक्‍का लावणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. या टोळीने अशाचप्रकारे आणखी 7 ते 8 कृत्ये केली असून, त्यातील किती गुन्ह्यांची उकल झाली आहे व किती गुन्ह्यांची उकल झालेली नाही, याची माहिती घेतली जात आहे. यामुळे ही टोळी सराईत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उंब्रज येथील घटनेनंतर या टोळीने निपाणी, कर्नाटकसह ठिकठिकाणी चोर्‍या केल्या असल्याची कबुली दिली आहे.