Thu, Apr 25, 2019 14:11होमपेज › Satara › गर्भपात प्रकरणाचा तपास एलसीबीकडे

गर्भपात प्रकरणाचा तपास एलसीबीकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

कोंडवे गावच्या हद्दीत बेकायदा गर्भपात औषधांचा साठा सापडल्यानंतर बुधवारी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. दरम्यान,  संशयितांचा शोध घेऊन या टोळीचा व एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे आव्हान आता एलसीबीला स्वीकारावे लागणार आहे.

गेल्या आठवड्यात कोंडवे येथे सुमारे 50 हजार रुपये किमतीचा गर्भपात करणार्‍या औषधांचा साठा सापडल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यापूर्वी सातार्‍यात स्त्रीभ्रूण हत्या व बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याची प्रकरणे घडली आहेत. याचाच एक भाग म्हणजे गर्भपातासाठी लागणारी औषधे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय ती उपलब्ध होवू शकत नसतानाही ती खुलेआम विक्रीसाठी ठेवल्याचे आढळल्याने  खळबळ उडाली.

गर्भपाताच्या गोळ्या व कीट सापडल्याने यामध्ये मेडिकल, डॉक्टर, एजंट व अन्य कोणाचा समावेश आहे? हे समोर येणे गरजेचे बनले आहे. याप्रकरणी चार संशयितांची नावे समोर आली असतानाही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सातारा तालुका पोलिसांकडे होता. मात्र तालुका पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे वर्ग करण्यात आले.

बुधवारी या प्रकरणाची कागदपत्रे एलसीबी विभागाला प्राप्‍त झाली आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मोठी धेंडं असण्याची शक्यता असून जे कोणी असतील त्यांची नावे समोर येणे गरजेचे बनले आहे. औषधांचा साठा सापडल्याने त्या चार संशयितांकडे ती औषधे कशी आली? ते चौघे कुठे कामाला आहेत? ही औषधे कोणाच्या सल्ल्याने विकली जात आहेत? टोळीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? आतापर्यंत अशी किती औषधे विकली गेली? ती औषधे कोणाकोणाला विकली गेली? किती रुपयांना औषधांची विक्री होत आहे? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोस दिला जावू शकत नसल्याने यामध्ये कोण कोणत्या डॉक्टरांचा समावेश आहे? अशा विविध घटनांचा एलसीबीला तपास करावा लागणार आहे.

Tags : Satara, Satara News, Investigation, Wednesday,  discovery, illegal drugs, abortion, investigations, Department, Local Crime Investigation


  •