Fri, Apr 26, 2019 03:27होमपेज › Satara › रिलायन्सच्या कामाची चौकशी करा 

रिलायन्सच्या कामाची चौकशी करा 

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:34PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने अर्धवट व दर्जाहीन स्वरुपात केले असून पुलांची किंवा कठड्यांची ठेकेदाराने कलेली कामे वाहनधारक व प्रवाशांच्या मुळावर उठत आहेत. या सर्व निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

करारातील अटींनुसार महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करुन त्यानंतरच वाहनांकडून टोल वसुली वसूल करायची होती. मात्र, निर्धारीत कालावधीत रिलायन्स कंपनीने हे काम पूर्ण न केल्याने त्यांना टोल वसुलीचा अधिकार नाही.  तरीही जनतेला लुबाडण्याचाच उद्योग त्यांनी केला आहे. अपूर्ण व दर्जाहिन कामामुळे आजवर 1700 हून अधिक नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे.  

महामार्गावर वाई तालुक्यात भुईंज व पाचवड येथे बांधण्यात आलेले नवीन पूलही कोसळले होते. महामार्गाच्या दुतर्फा असणारे तीन पदरी रस्तेही सध्या अपूर्णावस्थेत आहेत. जेथे पुल उभारला आहे, तिथे तीनपदरी रस्त्यांना दुपदरी करण्याचे अतार्किक प्रकारही घडले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या रस्ते दुभाजक उभारुन महामार्गावर येण्यासाठी अवैधरित्या मार्ग खुले केले आहेत. बांधकामादरम्यान पुल जोडणीमधील सांधे तांत्रिकदृष्ट्या अयोग्य व चुकीच्या पद्धतीने जोडल्याने हे काम बर्‍याच प्रमाणात सदोष झाले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

टोलनाक्यावर वजनकाटे उपलब्ध नसल्याने अंदाजपंचे वजन सांगून जाणीवपूर्वक जादा वजनाच्या वाहनांचा टोल आकारला जातो. ठेकेदार व महामार्ग प्राधिकरण यांनी संगनमताने महामार्गाबाबत गुलाबी चित्र उभे करुन पैसे उकलण्याचाच अवैध धंदा उभारला असल्याचा आरोपही मोझर यांनी केला आहे. 

जोपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणताही टोल वसूल करु नये, सार्वजनिक नुकसानीस जबाबदार ठरल्याप्रकरणी माफी मागून रस्ते बांधणीस विलंब झाल्याने होणारी दंडाची रक्कम  शासनाकडे जमा करावेत.  रस्त्याच्या अर्धवट व दर्जाहीन कामांबाबत आम्ही वकीलांमार्फत नोटीस दिल्यानंतर किरकोळ स्वरुपात कामे सुरु झाली असली तरी त्यास पुरेशी गती नाही.  त्यामुळे लवकरच न्यायालयात याचिका दाखल करीत असून संबंधित ठेकेदार व बांधकाम कंपनीला जिल्हा दंडाधिकार्‍यांनी  योग्य ती समज द्यावी व वाहनधारक व जनतेला होणार्‍या त्रासातून त्यांची मुक्तता करावी. गेल्या अनेक वर्षांपासून वसुली केलेल्या टोलनाक्याच्या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: चौकशी करावी, अशी मागणीही मोझर यांनी केली आहे. 

निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विकास पवार, धैर्यशील पाटील, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, युवराज पवार, मनोज माळी, मधुकर जाधव, महेश जगताप, सागर पवार, गोरख नारकर, दादासाहेब शिंघन, सौ. अनिता जाधव, सौ. मनिषा चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.