होमपेज › Satara › खा. उदयनराजे यांच्याकडून आज कास धरण कामाची पाहणी

खा. उदयनराजे यांच्याकडून आज कास धरण कामाची पाहणी

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 10:42PM सातारा : प्रतिनिधी

सातार्‍याची जलदेवता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाची पाहणी सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे शनिवारी करणार आहेत. याचवेळी आघाडीतील नगरसेवकांची आढावा बैठक होणार आहे.खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातार्‍यात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. ही कामे गतीने आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी साविआच्या पदाधिकार्‍यांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोवईनाक्यावरील सुमारे 50 कोटींच्या ग्रेड सेपरेटरच्या कामाबरोबरच कास धरण उंची वाढवण्याचे सुमारे 50 कोटींचे कामही हाती घेण्यात आले.

त्यानंतर काही दिवसांतच सोनगाव कचरा डेपोतील सुमारे 18 कोटींच्या घनकचरा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभही झाला. ही कामे मध्यावर असतानाच सातारकरांसाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या भुयारी गटर योजनेच्या कामासही सुरुवात होणार आहे.  सतर्कता राखत एकापाठोपाठ एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे. दि. 7 रोजी दुपारी  12 वाजण्याच्या सुमारास कास धरण उंची वाढवण्याच्या कामाची पाहणी खा. उदयनराजे भोसले हे त्यांच्या आघाडीच्या नगरसेवकांसह करणार आहेत. कास धरणाचे काम जलसंपदा विभागाकडून केले जात आहे. पाहणीनंतर त्याच ठिकाणी नगरसेवकांची आढावा बैठक दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीत विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. या बैठकीचे निरोप आघाडीतील नगरसेवक तसेच पदाधिकार्‍यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोहोचले होते.

Tags : Satara, Inspection, Kaas dam, work, today, MP  Udayan Raje