Fri, Jun 05, 2020 23:20होमपेज › Satara › जलस्त्रोतांची ‘जीओ फेन्सिंग अ‍ॅपद्वारे तपासणी 

जलस्त्रोतांची ‘जीओ फेन्सिंग अ‍ॅपद्वारे तपासणी 

Published On: Apr 25 2019 1:46AM | Last Updated: Apr 24 2019 11:55PM
सातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांची नोंदणी व्हावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व आरोग्य विभागाच्यावतीने जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपव्दारे जिल्ह्यातील 9  हजार 311 जलस्त्रोतांची  तपासणी करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात 9 हजार 311 सार्वजनिक जल स्त्रोतांतून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. या अ‍ॅपद्वारे पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर अशी दोनदा तपासणी केली जाणार आहे. यंदाच्या तपासणीसाठी 30 मार्चपासून पाणी नमुने घेण्यास सुरूवात झाली आहे. दि. 31 मेपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. या  जलस्त्रोतामध्ये  गेल्या तीन वर्षांच्या अत्यल्प पावसामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जलस्त्रोतामध्ये उपलब्ध घटक, पाणी पातळी यामधील फरक कळावा यासाठी जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपव्दारे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासयनिक तपासणी करण्यात येणार आहे. 

नमुन्यांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात चार उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. त्यानुसार कराड येथील प्रयोगशाळेत कराड, पाटण व कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंंद्र परिसरातील ग्रामपंचायती, दहिवडी येथील प्रयोगशाळेत खटाव, माण व कोरेगाव तालुक्यातील तडवळे, किन्हई प्राथमिक आरोग्य केंंद्र परिसरातील ग्रामपंचायती, खंडाळा येथील प्रयोगशाळेत फलटण, खंडाळा व वाई तालुक्यातील  वाठार स्टेशन आणि पळशी प्राथमिक आरोग्य केंंद्र परिसरातील ग्रामपंचायती, सोमर्डी येथील प्रयोग शाळेत सातारा, जावली, महाबळेश्‍वर व कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड प्राथमिक आरोग्य केंंद्र  परिसरातील ग्रामपंचायतींनी पाणी  नमुने पाठवावेत. 

रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण करण्यात यावे. या बाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी उप मुख्यकार्यकारी अधिकारी किरण सायमोतेे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका कक्षाचे तज्ञ सल्लागार यांच्या मदतीने कक्षाच्या पाणी व गुणवत्ता सल्लागार या अभियानाचे सनियंत्रण करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल अ‍ॅपव्दारे  गोळा करावयाचे आहेत. गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोग शााळांतून करण्यात येणार आहे. 

असे आहेत जिल्ह्यातील जलस्त्रोत

पाणी नमुने तपासणीसाठी स्वतंत्र पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा 1 हजार 25 कोरेगाव 1 हजार 4, खटाव 1 हजार 601, माण 982, फलटण 972, खंडाळा 325, वाई 431, जावली 576, महाबळेश्‍वर 288, कराड 1 हजार 63, पाटण 1 हजार 44 अशा सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने संकलन करण्यात येणार आहेत. पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यातील घटकांची तपासणी करण्यासाठी नमुने भूजल सर्वेक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.

तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  जलस्त्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होणार आहेत. त्यावर  जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुध्द पाणी मिळावे हाच प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. -डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी.