Sun, Aug 25, 2019 19:20होमपेज › Satara › सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय 

सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय 

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 8:40PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केवळ आश्‍वासने दिली. मात्र निवडणुकीनंतर दिलेला शब्द कधीच पाळला नाही. सर्व घोषणा खोट्या ठरल्या असून, सरकारकडून जनतेची फसवणूक झाली आहे. आज राज्यकर्ते विदर्भ - मराठवाड्याला झुकते माफ देतात. त्याचवेळी पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

पोतले (ता. कराड) येथील पोतले - येणके बंधार्‍यामधील जलपूजन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, कराडचे नगरसेवक किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वांग - मराठवाडी प्रकल्पातंर्गत पोतले-येणके सर्वात मोठा बंधारा आहे. त्यामुळे 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकर्‍यांचे जीवनमान बदलणार आहे. हे भविष्य लक्षात घेऊन पाणी हेच जीवन समजून पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले. 

तसेच, सरकारवर टीका करताना आ. चव्हाण यांनी भाजपचा नोटाबंदी व शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय फसला आहे. कर्जमाफीचे बँक खात्यावरील पैसे लाभार्थ्याला मिळत नाहीत. कर्जमाफीचा सावळा गोंधळ आणखी किती दिवस चालणार ? हा एक प्रश्‍नच आहे. हे सरकार हट्टीपणाने सर्व निर्णय घेत आहे. कर्जमाफीमुळे विकासकामाच्या खर्चावर कट लागला आहे. तो तीस टक्क्यांपुढे गेला आहे. त्यामुळे भविष्यात विकासकामे पूर्ण होतील की नाही, याबाबत शंका आहे. यावेळी डॉ. इंद्रजीत मोहिते, आ. आनंदराव पाटील, सरपंच सौ. माळी यांची भाषणे झाली. बाबासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. अंकुश नांगरे यांनी आभार मानले.