Fri, Jun 05, 2020 10:52होमपेज › Satara › सातार्‍यातील उद्योग निघाले गोवा, कर्नाटकाकडे

सातार्‍यातील उद्योग निघाले गोवा, कर्नाटकाकडे

Published On: Nov 29 2018 12:59AM | Last Updated: Nov 28 2018 10:17PMसातारा : विशाल गुजर 

राज्य  वितरण कंपनीने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना लागणार्‍या वीजेचे दर दुप्पट केले आहेत. या प्रचंड वीजदरवाढीचा ‘शॉक’ सातार्‍याच्या एमआयडीसीला बसला आहे. त्यामुळे सातार्‍यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील फौंड्री उद्योग संकटात सापडला असून कारखानदारांना महिन्याला लाखो रूपयांचा  फटका बसत आहे. त्यामुळे  सातार्‍यातील अनेक बडे उद्योग राज्यालगतच्या गोवा तसेच कर्नाटककडे जाण्याच्या तयारीत आहेत. याचा परिणाम कामगारांवर होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

सातार्‍याची औद्योगिक वसाहत विविध  समस्यांच्या कचाट्यात सापडली आहे. फौंड्री, फोजिर्ंग, स्टील, रबर, प्लास्टिक तसेच  प्रोसेस इंडस्ट्रीज या उद्योगांना वीजेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.  मात्र  वीज वितरण कंपनीने प्रतियुनिट 10 रुपये 5 पैसे इतक्या चढ्या दराने वीज बिलांची आकारणी  सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांवर याचे दुष्परिणाम झाले आहेत.  उद्योगधंद्यांना अर्थसहाय्य करणार्‍या राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँका, पतसंस्था यासुध्दा अडचणीत येणार आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत  महाराष्ट्रातील विजेचे दर जवळपास दुप्पट करण्यात आले आहेत.  उद्योगधंद्यांच्या माध्यमातून सरकारला महिन्याला व्हॅटपोटी 84 कोटी रुपये, एक्साईज टॅक्सपोटी 73 कोटी, वीज बिलापोटी 70 कोटी असे मिळून सुमारे 216 कोटी  रुपयांचा  महसूल मिळतो. उद्योग अडचणीत आल्यामुळे किंवा परराज्यात स्थलांतरित झाल्यामुळे त्याचा परिणाम सरकारच्या महसुलावर झाला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात फौंड्री  उद्योगांची संख्या 413 हून अधिक आहे. त्यामध्ये  सुमारे 2 लाख कामगार राबत आहेत. या उद्योगावर अनेक कुटुंबांचा संसार चालत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून महिन्याला सुमारे 550 ते 600 कोटी रूपयांचा महसूल फौंड्री उद्योगातून मिळतो. मोठे उद्योग जर गेले तर त्यांच्यावर अवंलबून असणार्‍या छोट्या उद्योगधंद्याना घरघर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुसज्ज कारखाना उभारण्यासाठी आवश्यक गुंतवणूक त्यांच्याकडे नाही. वीज दरवाढीमुळे मोठ्या उद्योगांना  महिन्याला सुमारे 50 ते 60 लाख तर छोट्या व्यवसायिकांना सुमारे 50 हजार  ते 1 लाख रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. याचा परिणाम सुमारे 30 ते 40 हजार कामगारांवर होणार आहे. बेकारी आणि उपासमार वाढण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्ट, अन्य घरगुती व्यवसायही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. 

वीजेची उत्पादन क्षमता कमी असताना दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा तोटा दाखवला जातो. अशाप्रकारे महाविरतणच्या अकार्यक्षमतेमुळे सर्वसामान्यांना कोट्यवधी रुपयांच्या दरवाढीचा ‘शॉक’ बसत आहे. सन 2015 व 17 साली झालेली तूट भरून काढण्याचे काम वीज वितरण कंपनी करत आहे. वीजदरवाढीमुळे महाराष्ट्रात उद्योग वाढू शकणार नाहीत. वीजदरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांना भोगावे लागणार आहे.