Fri, Apr 26, 2019 01:20होमपेज › Satara › ‘जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’

‘जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:45PMसातारा : प्रतिनिधी

भारतीय प्रजासत्ताक दिन शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी साजरा होत असून गुरुवारी शहरातील सर्व शाळा-शाळांमधून  प्रजासत्ताक दिनाचाच माहोल दिसून आला. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध संस्था, संघटना यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यामुळे आज देशभक्तीपर गीतांनी सारे वातावरण भारावून जाणार आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. 

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने ध्वजारोहण, ग्रामसभा यासह विविध विधायक उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे  औचित्य साधून नवे संकल्पही करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाळा, शाळांमधून प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू होती. ध्वजगीत, राष्ट्रगीत तसेच परेड, कवायत यांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात होता. याशिवाय शासकीय कार्यालये, विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्या कार्यालयात ध्वजारोहणाच्या तयारीची लगबग  सुरू होती. बाजारपेठेतही बालचमूंसाठी तिरंगा ध्वज दाखल झाले होते. 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये देशभक्तीचा जागर होणार आहे. त्याची तयारीही पूर्णत्वास गेली आहे. गाव पातळीवरही विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्याची तयारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू होती. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या ग्रामसभांनाही विशेष महत्त्व असते. 

जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी जिल्ह्यातील नागरिकांना  उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक, अधिकारी - कर्मचारी, सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकार्‍यांनी  ध्वजारोहणाच्या या सोहळ्यास  उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. 26 जानेवारी 2018 रोजी येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. मुख्य  शासकीय ध्वजारोहण समारंभास जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहता यावे, यासाठी विविध शासकीय, अशासकीय कार्यालये तसेच संस्थांनी आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ सकाळी 8.30 ते 10 ही वेळ सोडून आयोजित करावा.

नागरिकांना उपस्थित राहता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून स्थानिक जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सातारा शहरवासीयांनी या मुख्य शासकीय ध्वजारोहणास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.