Sun, Apr 21, 2019 00:32होमपेज › Satara › भारत-पाक युद्धातील जखमी सैनिकाला पन्नास वर्षांनी न्याय

भारत-पाक युद्धातील जखमी सैनिकाला पन्नास वर्षांनी न्याय

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 9:10PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

भारत पाकिस्तानच्या 1971 च्या युध्दात जखमी झालेल्या हिंगनोळे ता. कराड येथील जखमी सैनिक हिंदुराव जगन्नाथ इंगळे यांना तब्बल पन्नास वर्षांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने न्याय मिळाला आहे. इंगळे यांच्यासाठी मुंबई हायकोर्टाचे वकिल अ‍ॅड.राजेश्‍वर पांचाळ यांनी वकिलपत्र घेवून जखमी सैनिक इंगळे यांची न्यायाची लढाई जिंकली आहे.

हिंदुराव जगन्नाथ इंगळे हे 1965 रोजी 215 रेजिमेंंंंंट मध्ये भरती झाले. सन 1971 च्या भारत - पाकिस्तान युध्दात ते जखमी झाले. त्यानंतर ते 1975 रोजी घरी परतले. सैन्यदलाच्या वतीने त्यांना पदके मिळाली. कँटीन कार्ड मिळाले, परंतु सेवानिवृत्‍ती वेतन मिळाले नाही. शासन आदेशानुसार दहा एकर जमीन मिळाली नाही. राहण्यासाठी जागा मिळाली नाही. यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. व त्यानंतर मात्र त्यांचा जगण्यासाठी खरा संघर्ष सुरू झाला.  

देशाच्या संरक्षणासाठी लढलेल्या या जवानाला स्वतःच्या व कुटूंबाच्या दोन वेळच्या अन्नासाठी मात्र लढाई लढण्याची वेळ आली. युध्दात मांडीला झालेल्या जखमेमुळे अपंगत्व आल्यामुळे इंगळे यांना कष्टाचे काम जमत नव्हते. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी या सर्वांचे कष्टमय जगणे सुरू झाले. अशा परीस्थितीत इंगळे यांनी हक्‍काच्या जमिनीसाठी, जागे साठी मुंबई, दिल्‍ली येथे हेलपाटे मारले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही.

इंगळे यांच्या न्याय हक्‍कासाठी सुरू झालेल्या संघर्षाला मुंबई हायकोर्टाचे वकिल अ‍ॅड.राजेश्‍वर पांचाळ यांची साथ लाभली. आणि अ‍ॅड.पांचाळ यांनी इंगळे यांचे वकिलपत्र घेण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी आर्थिक मदतही करू लागले. या न्यायालयीन लढाईचा निकाल नुकताच लागला असून, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला असून, या आदेशात जखमी सैनिक हिंदुराव इंगळे यांना एक महिन्याच्या आत पन्नास हजार रूपये देण्यात यावेत.

तसेच तीन महिन्यांच्या आत डिसेंबर 1971 च्या जीआर नुसार दहा एकर शेतजमीन व राहण्यासाठी तीन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच जवानाला या सर्व बाबी यापूर्वीच मिळणे अपेक्षित होते मात्र त्या मिळू शकल्या नाहीत म्हणून शासनाला पन्नास हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.     

 

Tags : satara, satara news, India Pakistan war 1971, Soldier Hindurao Ingale, injured, justice