Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Satara › कराडात वाढती गुन्हेगारी चिंताजनक!

कराडात वाढती गुन्हेगारी चिंताजनक!

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:28PM

बुकमार्क करा

कराड : अमोल चव्हाण

कराड शहरासह तालुक्यात काही दिवसांपासून कमी झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. पोलिसांवर हात उगरणे, महिलेवर वार करून खंडणी मागणे, किरकोळ कारणावरून मारहाण करून युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणे, चोर्‍या, घरफोड्या अशा घटना घडत आहेत. एवढेच नव्हेतर विद्यार्थिंनी स्वच्छतागृहाचे चित्रीकरण करण्यापर्यंत विकृत मनोवृत्तीचा किळसवाणा प्रकार कॉलेज परिसरात घडत आहे. एकूणच ही वाढती गुन्हेगारी चिंताजनक बनत असल्याचे दिसून येत आहे. 

लुटालूट, घरफोडी, चोर्‍यांसह मारामार्‍या अशा घटना कराडला नवीन नाहीत. मध्यंतरी वाढलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांनी चांगलाच वचक निर्माण केला होता. पंरतु, सध्या पुन्हा गुन्हेगारांनी डोके वार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी घटना वाढत असून ही शहर व तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. वारुंजी फाट्यावर सतनाम एजन्सीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेनंतर कराड शहरासह तालुक्यात चोर्‍या व घरफोड्यांच्या घटनांची सुरु झालेली मालिका काहीकाळासाठी थांबलेली होती. परंतु, सलग दोन दिवस झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे ती चोरीची मालिका पुन्हा सुरू झाली आहे की काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. गुन्हेगारी घटना घटल्यानंतर पोलिसांनी अनेक जुने गुन्हे उघडकीस आणले होते. मात्र, दररोज गुन्हेगारी घटना घडायला लागल्यातर पोलिसांचा सर्ववेळ यामध्येच जात असतो. त्यामुळे जुने गुन्हे उघडकीस आणण्यास त्यांना वेळच मिळत नाही. तशीच परिस्थिती सध्या पोलिसांची झाली आहे. रोज नवीन गुन्हा पोलिसात दाखल होत असल्याने पोलिस वैतागले आहेत. 
शेणोली येथे दरोडा टाकून पळणार्‍या दरोडेखोरांना पोलिसांनी पकडल्यानंतर समाजातून पोलिसांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप पडली. अनेकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यानंतर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकाही काही किरकोळ प्रकार वगळता अतिशय शांततेत पार पडल्या.  भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या भावावर झालेल्या गोळीबार घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही. त्याबाबत अद्याप पुढे काहीच झाले नाही. पुंगळ्यांबाबत प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल आला किंवा नाही? हे समजू शकले नाही.  

काही दिवसांपुर्वी कॉलेजपरिसरात विद्यार्थिनी स्वच्छतागृहाचे मोबाईलव्दारे करण्यात आलेले चित्रीकरण हा प्रकार विकृत्त मनोवृत्तीचा किळसवाणा प्रकार असाच आहे. तर रेठरे येथील मारामारी त्यानंतर पोतले येथे मारहाण करून युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना ताज्या असतानाच विमानतळ व विद्यानगर परिसरात झालेल्या चोरीमुळे  कराड शहरासह तालुका पुन्हा ढवळून निघाला आहे. सध्या सुरु असलेल्या या गुन्हेगारी घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.