Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Satara › कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता संपल्याने वाढली चिंता

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता संपल्याने वाढली चिंता

Published On: Aug 25 2018 7:31AM | Last Updated: Aug 24 2018 8:45PMपाटण : प्रतिनिधी

महाराष्ट्राची वरदायिनी मानले जाणारे कोयना धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1 जूनपासून शुक्रवारपर्यंतची आकडेवारी पाहता धरणात तब्बल 44 टीएमसी जादा पाणी आहे. आजवर धरणातून 42 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले असून धरणात येणारे सर्व पाणी आता नदीत सोडावे लागत आहे. त्यामुळेच सिंचन विभागाचा कसोटी पणाला लागली आहे.

यावर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र जुलैच्या पहिल्याच 15 दिवसानंतर सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. अपेक्षेपेक्षाही अधिक पाऊस झाल्याने धरणात मुबलक पाणी आले. त्यामुळे साठवण क्षमता संपुष्टात आल्याने ज्या प्रमाणात पाण्याची आवक होईल, त्याच प्रमाणात पुढे कोयना नदीत पाणी सोडण्यात येत आहे. सुदैवाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असला तरी कराडसह पाटण तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळेच कोयनेसह कृष्णा नदीच्या पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता कायम असून पूर्वेकडे महापुराने होणारे ज्यादा नुकसान आत्तापर्यंत टळले आहे. 

यावर्षी आत्तापर्यंत धरणात सरासरी तब्बल प्रतिसेकंद 60 हजार क्युसेसपर्यंत पाण्याची सर्वाधिक आवक गेली होती. यावेळी सर्वाधिक म्हणजेच सहा वक्री दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले होते. सध्या त्याची दिवसातून अनेकदा कमी अधिक प्रमाणात हालचाल केली जात आहे. चालूवर्षी धरणात आत्तापर्यंत तब्बल 130 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी ती 86 टीएमसीपर्यंत मर्यादित होती. एक जूनपासून आत्तापर्यंत पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 6.93 टीएमसी पाणी, पूर्वेकडे सिंचनासाठी 1.73 टीएमसी पाणी, पूरकाळात 5.76 टीएमसी अशा 14.42 टीएमसी पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे. तर कोणताही वापर न करता तब्बल 42 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले. गेल्यावर्षी 24 ऑगस्टपर्यंतचा विचार करता केवळ 1.50 टीएमसी इतकेच पाणी सोडण्यात आले होते. 
यावरूनच आता सातारा, सांगलीसह राज्यातील अन्य कृष्णा नदीकाठच्या ठिकाणचा महापूर व होणारे संभाव्य नुकसान सिचंन विभागापेक्षा निसर्गाच्याच हातात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

निसर्गाची सिंचन विभागाला साथ आणि पूर परिस्थितीवर मात

कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांचा अनुभव दररोज पणाला लागत आहे. हवामान खात्याचा अंदाज घेत  पाणी सोडण्याचा जागेवरच घ्यावा लागणारा निर्णय, त्याचे दुष्परिणाम या सर्वाचा समतोल राखण्यात आजवर यशच आले आहे. सुदैवाने निसर्गाचीही तितकीच महत्वाची साथ मिळाली असून आता पावसाने उघडीप द्यावी, अशीच प्रार्थना करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.