होमपेज › Satara › खटाव तालुक्यात वैशाखी वणवा

खटाव तालुक्यात वैशाखी वणवा

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 8:22PMऔंध : वार्ताहर

खटाव तालुक्याच्या पश्‍चिम पट्टयात  मागील  काही दिवसांमध्ये वैशाखी वणवा जाणवू लागला असून तापमानाचा पारा वाढल्याने ग्रामीण भागातील जनजीवन होरपळून निघाले आहे. उष्णतेमुळे  अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणी पातळी घटली असून काही ठिकाणी कूपनलिका, विहिरी,आडातील पाणी गायब झाले आहे.

औंधसह परिसरात नांदोशी, खबालवाडी, लांडेवाडी, गोपूज, करांडेवाडी, वरूड, त्रिमली, कुरोली, भोसरे,अंभेरी,कोकराळे,लोणी, गोसाव्याचीवाडी आदी गावांमध्ये यंदा मागील वर्षापेक्षा उन्हाचा कडाका वाढला आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी  सहा वाजेपर्यंत  घरातून बाहेर पडणेही जिकिरीचे बनले आहे. उष्णतेमुळे दुपारी बारानंतर अनेक ठिकाणी सन्नाटा जाणवत आहे. सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे व ढगाळ वातावरणामुळे  सर्वत्र नागरिकांना त्रास सहन  करावा लागत आहे. 

सध्या प्रचंड उकाड्यामुळे अनेक जण शेतातील झाडांच्या सावलीच्या तसेच पोहण्यासाठी पाणवठे, तळी, विहीरींच्या शोधात भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.उन्हाच्या तडाख्यापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असून  प्रत्येकजण उन्हाळी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहू लागला आहे. कडक ऊन्हाळयामुळे प्राणी, पक्षी, वनसंपदाही होरपळून निघाली आहे.