Wed, Mar 27, 2019 00:02होमपेज › Satara › कोयनेचे दरवाजे तीन फुटांवर

कोयनेचे दरवाजे तीन फुटांवर

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:29PMपाटण : प्रतिनिधी

पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी बंद करण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी पुन्हा तीन फुटांनी उचलून धरणातील पाण्याचा कोयना नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, धरण भरण्यासाठी आता केवळ 1 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्‍वर, नवजासह कोयना येथे पावसाचा जोर वाढल्याने स्वातंत्र्यदिनी सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर शनिवार, 25 ऑगस्ट म्हणजेच 10 दिवसांच्या कालावधीत दरवाजे सहा फुटांपर्यंत उघडून धरणातून पाणी सोडून पाणीसाठा 102 टीएमसीच्या घरात नियंत्रित करण्यात आला होता.

त्यानंतर शुक्रवारपासून पावसाने उघडीप दिल्याने शनिवारी धरणाचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र वीज निर्मिती करून पायथा वीजगृहातून कोयनेत प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला होता. धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी असून रविवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठी 103.95 टीएमसीपर्यंत पोहचला होता. धरणात जवळपास संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता आणि सध्यस्थितीत पाणलोट क्षेत्रातील पाऊस पाहता आता धरणात येणारे पाणी सोडण्याशिवाय धरण व्यवस्थापनाकडे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही.

धरणात रविवारी सायंकाळी पाणलोट क्षेत्रातून प्रतिसेकंद 16 हजार 650 क्युसेस पाण्याची आवक होत होती. त्या तुलनेत सहा दरवाजे तीन फुटांनी वर उचलून त्यातून प्रतिसेकंद 27 हजार 152 आणि पायथा वीज गृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेस असा 29 हजाराहून अधिक क्युसेस पाणी सोडून पाणीसाठा नियंत्रित करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील पाणीउंची 2 हजार 161.6 फूट, जल पातळी 658.978 मीटर इतकी होती. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे 4 हजार 985 मी. मी., नवजा येथे 5 हजार 335 मी. मी. तर महाबळेश्‍वर येथे 4 हजार 678 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.