Fri, Aug 23, 2019 14:50होमपेज › Satara › 15 दिवसांत 36.51 टीएमसी पाण्याची आवक

15 दिवसांत 36.51 टीएमसी पाण्याची आवक

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:24PMपाटण ः गणेशचंद्र पिसाळ

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांचे लक्ष लागलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित वाढ झाली आहे. या पंधरवड्यात सरासरी बाराशेहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद होवून यातून धरणात 36.51 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात आता 66.31 टीएमसी पाणीसाठा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल 23.89 टीएमसीने ज्यादा आहे. स्वाभाविकच याचा सकारात्मक परिणाम झाल्याने आत्तापर्यंत जास्त वीजनिर्मिती करूनही धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध आहे. 

एक जूनपासून या धरणाचे तांत्रिक वर्ष सुरू होते. जुन महिन्यात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा न झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात ही चिंता मिटवत गतवर्षीपेक्षा ज्यादा पाणीसाठा व त्यापटीत वीजनिर्मिती करण्यात प्रशासन निसर्गाच्या सहाय्याने यशस्वी झाले आहे. जून महिनाअखेर धरणांतर्गत विभागात केवळ एक हजार मिलीमीटरच्या आतच येथे पावसाची नोंद झाली होती. तर धरणात त्या महिन्यात केवळ 5.63 टीएमसीची आवक होवून एकूण 30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मात्र चालू पंधरवड्यात येथे कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या महत्त्वपूर्ण ठिकाणी सरासरी बाराशेहून अधिक मि.मि. पावसाची नोंद झाली आणि धरणात तब्बल 36.51 टीएमसी पाण्याची आवक होवून सध्या धरणात 66.31 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा तब्बल 23.89 टीएमसीने जास्त आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 4.32 टीएमसी तर पूर्वेकडे सिंचनासाठी 1.73 टीएमसी पाणीवापर होवून यातूनच 206.400 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. तर एक जूनपासून आत्तापर्यंत धरणात एकूण 42.14 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. 

गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस धरणातील एकूण पाणीसाठा त्याची साठवण क्षमता व धरणांतर्गत विभागात पडणारा पाऊस व येणार्‍या पाण्याचा विचार लक्षात घेऊन 30 जुलैला प्रथम पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून तर 31 जुलैला धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले होते. चालूवर्षी जर पावसाचा जोर व येणार्‍या पाण्याचे प्रमाण असेच राहिले तर कदाचित यावेळी धरणातून लवकर पाणी सोडावे लागण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  38.69 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.