Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Satara › बेफाम डम्पर चालकांमुळे जीव टांगणीला 

बेफाम डम्पर चालकांमुळे जीव टांगणीला 

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:06PMकराड : प्रतिनिधी 

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघितल्यास डम्परने दिलेल्या धडकेमुळे झाल्याचे दिसते. कराड शहर व तालुक्यात या पंधरा दिवसात चौघाजणांना जीव गमवावा लागला. या बेफाम डम्पर चालकांमुळे पादचार्‍यांबरोबर वाहनधारकांचाही जीव टांगणीला लागला आहे. या सुसाट डम्परचालकांना आवरा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

वाहतूक शिस्तीचे सर्व नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे वाहन चालवून दुचाकी व पादचार्‍यांना चिरडण्याची मानसिकता बहुतेकवेळा डम्पर चालकांमध्ये दिसून येते. कुटुंबातील एक व्यक्ती अपघातात गेली तरी संपूर्ण कुटुंब उघड्यावर येतं याची कसलीच जाणीव या उद्दाम डम्पर चालकांना नाही. अपघात हा अपघात असतो असे म्हणून डम्पर चालकांच्या चुकांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक निष्पापांना आपले जीव गमवावे लागत आहेत. 

महामार्गावर होणारे अपघात बघितल्यानंतर यामध्ये धडक देणारे वाहन हे बहुतेकवेळा डम्परच असते. याचे काय कारण असावे. कारण यावरील चालक हे एकतर परप्रांतिय असतात किंवा व्यसनी तरी असतात. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. डम्पर मालकही बेजबाबदार वागत आहेत. त्यांच्याकडून चालकांवर कसलेच निर्बंध घातले जात नाहीत. त्यामुळे डम्परचालकांचा मनमानीपणा वाढत चालला असून  समोर येणारे वाहन, व्यक्ती यांना सरळ धडक देवून भरधाव वेगाने निघून जाण्याचे प्रकार  वाढले आहेत. 

अज्ञात वाहनाची धडक या मथळ्याखाली रोज वृत्तपत्रात बातम्या येत असतात. ती अज्ञात वाहने बहूतेकवेळा डम्परच असतात, अशी शक्यता पोलिस यंत्रणाही व्यक्त करते. पंधरा दिवसांपूर्वी महामार्गावर वाठार ता. कराड गावच्या हद्दित दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघेजण ठार झाले. त्या वाहनाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अज्ञात वाहनाचा तपास बहुतेकवेळा पोलिस यंत्रणेकडून होतही नाही. यापूर्वी असे अनेक अपघात महामार्गावर घडले आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. 

मागील आठवड्यात दत्त चौकात पहाटे डम्पर चालकाने पादचार्‍याला जोराची धडक दिली. एका सायकल स्वारालाही ठोकरले. पादचारी जागीच ठार झाला. नशिब बलवत्तर म्हणून सायकल स्वार बचावला. हा अपघात ज्या रस्त्यावर झाला तो रस्ता शहरात मध्यवर्ती भागात आहे. त्या रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी असताना नियम धाब्यावर बसवून डम्पर चालकाने डम्पर या रस्त्यावरून भरधाव चालवत बळी घेतला. 

यानंतर चारच दिवसात विजय दिवस चौकात ट्रकखाली सापडून मोटारसायकलच्या मागे बसलेली महिला ठार झाली. मरण इतके स्वस्त झाले आहे की रस्त्यावरून फिरताना कधी डम्परच्या रूपाने काळ झडप घालील याची भीती वाहनधारकांना सतावत आहे. पोलिस,  आरटीओ कार्यालयाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून बेभाम झालेल्या या डम्पर चालकांवर कारवाईचा बडगा उगारावा. जेणे करून काहींचे प्राण तरी वाचतील.

 

Tags : karad, karad news, dumper, accident,