Wed, Jul 24, 2019 12:56होमपेज › Satara › कराड तालुका चोर्‍या, मारामार्‍यांनी हादरला!

कराड तालुका चोर्‍या, मारामार्‍यांनी हादरला!

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:19PMकराड : अमोल चव्हाण

कराड शहर व तालुक्यात खून, फसवणूक, लुटालूट, घरफोडी, चोर्‍यांसह मारामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विविध पोलिस ठाण्यातील बहुतांशी अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून नव्याने आलेल्या पोलिस अधिकार्‍यांसमोर गुन्हेगारांनी आव्हान उभे केले आहे.  

महामार्गावर साडेचार कोटी रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले असले तरी यातील अजून सहा संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्या पोलिस शोध घेत आहेत. रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने कराड पोलिसांनी काही तासातच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. रत्नागिरी पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा पाठलाग करत त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी चोरटे व मुद्देमाल रत्नागिरी पोलिसांना कराड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला.  

याचदिवशी विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या व अलिकडे गुन्हेगारांची पंढरी म्हणून नावारूपास येत असलेल्या विद्यानगरमध्ये मारामारीची घटना घडली. अशा मारामारीच्या घटना नेहमीच विद्यानगर परिसरात घडत असतात. त्यावर अद्यापपर्यंततरी पोलिसांना नियंत्रण ठेवता आले नाही. हे कमी म्हणून की काय भरधाव वेगात मोटरसायकल मरणे, रस्त्यावरून चालणार्‍या मुलींना कट मारणे अशा घटना घडत असतात. एवढेच काय कॉलेज परिसरात यापुर्वी खूनी हल्ला व खूनाचा कट रचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कारवाईची मोहिम राबविल्यानंतर त्यावेळेपुरते अशा घटनांना आळा बसतो. इतरवेळी मात्र मागले पाढे पंचावन्न असतात. यासाठी पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. हुल्लडबाज युवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यानगरमध्ये असलेल्या पोलिस चौकीमध्ये अनेकवेळा पोलिस शोधण्याची वेळ येते. वाहतुक शाखेचे पोलिस मात्र, कॅनॉलवर उभे राहून सावज शोधत असताना सोबत असलेल्या पावती पुस्तकाचा धाक वाहनधारकांना दाखवित असतात. यामध्ये त्यांना महिन्याचे टार्गेट दिले जात असल्याने त्यांची नजर वाहतुक व्यवस्थेपेक्षा सावजावरच जास्त असते. 

मलकापूरमध्ये सुमारे दोन महिन्यांपुर्वी जमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणानंतर आता तालुक्यातील वराडे येथे आईसह पत्नीवर वार करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असला तरी आई व मुलगा मृत्यूशी झुंज देत आहेत. स्वत:च्या आईसह पत्नीवर खूनी हल्ला करण्याची मानसिकता का झाली. संशयितांकडून टोकाचे पाऊल का उचलले जाते.  याचाही शोध घेऊन त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही घटना का घडली याचा पोलिस शोध घेत असतानाच शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायीकाचे कोल्हापूर नाक्यावरील कार्यलय व एका बँकेची शाखा चोरट्यांनी फोडली. या दोंन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

बिल्डरच्या कार्यालयातून 5 लाख 90 हजारांची रोकड चोरीला गेल्याने त्यांनी एवढी रक्कम कार्यालयात ठेवलीच कशी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांनी फिर्यादीत दिलेल्या कारणांची पोलिस चौकशी करत आहेत. कोणी जवळच्या किंवा माहितीगार व्यक्‍तीचा यामध्ये समावेश आहे का? याचाही पोलिस शोध घेत आहेत. अशा घटना दोन किंवा तीन व्यक्‍त करत असतात. यापुर्वी सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात घडल्या असून त्याचाही अद्याप तपास लागला नसल्याने कराड पोलिसांना तपासाच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महामार्गालगत होणार्‍या चोरीच्या घटनांमध्ये चोरटे वाहनांचा वापर करत असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांना समोर आव्हान आहे. या व अशा अनेक घटना कराडशहर व तालुक्यात घडत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यातच सध्या तालुक्यातील पोलिस ठाण्यांमध्ये अनेक नवीन अधिकारी बदलून आले आहेत. कराड शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे स्वागतच गुन्हेगारी घटनांनी केल्याने व ते आल्यापासून दररोज काहीतरी घटना घडत असल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारांनी आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.