Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Satara › ज्ञानदीप पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी : डॉ. श्रीनिवास पाटील 

ज्ञानदीप पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी : डॉ. श्रीनिवास पाटील 

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यासह राज्यात असणार्‍या इतर बँकांपेक्षा ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे काम प्रेरणादायी असून संस्थेने आपले अर्थकारणरूपी ज्ञान गरिबांसाठी वाटून राज्यात एक वेगळी पत तयार केली आहे. अशा संस्थांमुळेच सहकाराची पंढरी म्हणून सातार्‍याची वेगळी ओळख आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.

ज्ञानदीप पतसंस्थेच्या सातारा शाखा नूतन कार्यालय, विभागीय कार्यालय सातारा व प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, नगरसेविका सविता फाळके, बँकेचे संस्थापक विश्वनाथ पवार, अध्यक्ष जिजाबा पवार, उपाध्यक्ष गजानन धुमाळ, सचिव रविंद केंजळे, मुख्य व्यवस्थापक शंकर ढमाळ, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, सहकार म्हणजे एक प्रकारे ‘पैरा’ करण्याची पद्धत आहे. ज्ञानदीप हे गेल्या 40 वर्षांपूर्वी रोवलेले एक छोटेसे रोपटे होते, ते  आता महाकाय वृक्ष बनले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी मुलुंड येथे पहिली शाखा सुरू करण्यात आली, आता तिच्या 103 शाखा झाल्या आहेत. विशेष म्हणजे या संस्थेत गेल्या 40 वर्षापासून एकदाही निवडणूक झाली नसून असा हा पॅटर्न राज्यात सगळ्याच क्षेत्रात झाला तर सगळीकडे  ‘दीप’ च उजळेल, हे मात्र खरे आहे. या संस्थेत 17800 कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. यापेक्षा मोठे काहीच नाही. आपल्या समाजातील लोक मोठे करण्याचेही काम संस्था करीत आहे हे खूप महत्त्वाचे आहे. ही बँक खूप बळकट झाली असल्याचे गौरवोद‍्गारही त्यांनी  काढले. 

सौ. माधवी कदम म्हणाल्या, ज्ञानदीप पतसंस्थेमुळे रोजी रोटीसाठी धडपडणार्‍या  लोकांना बचत करण्याची एक वेगळी सवय लागली. या संस्थेने सातत्याने समाजात विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळेच ती प्रगतीकडे गेली आहे. संस्थेचे संस्थापक  विश्‍वनाथ पवार म्हणाले, आधुनिकतेची कास धरुन ज्ञानदीप पतसंस्थेची कामे गतीमान होत आहेत. ग्राहकांच्या दारामध्ये जावून त्यांना सुविधा देण्याचे काम पतसंस्थेद्वारे केले जात आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून उद्योगावर भर देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्ञानदीपची भावना एकट्याने न जगता सर्वांना घेवून जगण्याची आहे.

प्रकाश आष्टेकर म्हणाले, ज्ञानदीप पतसंस्थेने छोट्या कामगारांना बचत करण्याची सवय लावली आहे. सावकारांपासून पिळवणूक थांबावी यासाठी या पतसंस्थेची निर्मीती झाली आहे. जिजाबा पवार  प्रास्तविक करताना म्हणाले, 2 सप्टेंबर 1978 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. 300 सभासद आणि 13 हजार भाग भांडवलावर उभी केली होती. आता याच्याच 103 शाखा आणि 3670 कोटींचा टप्पा पूर्ण करून राज्यातील 34 बँका व 17 जिल्हा बँकांपेक्षा मोठी आहे. विश्वासार्हता निर्माण करणारी संस्था म्हणून ज्ञानदीपकडे पाहिले जात आहे. संस्थेतर्फे ‘ज्ञानदीप अ‍ॅप’ सुरू करण्यात आले आहे.

त्यामुळे खातेदार राजास त्याने किती पैसे भरले, काढले, किती शिल्लक या सर्व बाबी मोबाईलवर समजत आहेत. तसेच लोकांना वीज बिल भरण्यास अनेक अडचणी येत असल्याने ‘बीबीपीएस’ हे अ‍ॅप  तयार केले असून घर बसल्या तुम्ही बिल भरू शकता. आशा अत्याधुनिक सुविधाही सुरू केल्या आहेत. ज्ञानदीपच्या माध्यमातून दरवर्षी 200 गरीब मुलांना दत्तक घेतले जाते. यासह पाणी फाउंडेशन, जलयुक्त शिवार,  झाडे लावा देश वाचवा  यासाठी सभासदांना झाडे वाटप करण्यात येते. यासह विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येत आहेत. आभार उपाध्यक्ष गजानन धुमाळ यांनी मानले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.