Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Satara › नावीन्यपूर्ण शासन योजनांचा पोलिसांनी लाभ घ्यावा  : सतीश माथुर

नावीन्यपूर्ण शासन योजनांचा पोलिसांनी लाभ घ्यावा  : सतीश माथुर

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:23PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबासाठी राज्य शासनाने कल्याणकारी, नावीन्यपूर्ण योजना सुरू केल्या असून या सर्व योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ सर्वांना मिळवून द्यावा, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी केले.

महाबळेश्‍वर येथे पोलिस कल्याण निधीतून महाबळेश्‍वर पोलिस कर्मचारी यांच्यासाठी पोलिस वसाहत बांधण्यात आली असून या भव्य इमारतीचे उदघाटन सतिश माथूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

महाबळेश्‍वर पोलिस कर्मचार्‍यांसाठी तीन इमारती बांधण्यात येणार आहेत यापैकी पहिल्या टप्प्यातील बारा खोल्यांच्या एका इमारतीचे उदघाटन करण्यात आले असून उरलेल्या दोन्ही इमारतींसाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात येईल, असेही सतीश माथुर म्हणाले.

पर्यटन स्थळी पोलिस विश्राममृह, नियमित वैद्यकिय तपासणी व उपचार योजना, गृह कर्ज योजना, पोलिस पब्लिक स्कूल अशा विविध योजना राज्य सरकार राबवित असून या योजनांचा  लाभ पोलिस कर्मचार्‍यांनी घ्यावा,  असे आवाहन सतीश माथुर यांनी केले.सतीश माथुर यांनी प्रथम नूतन पोलिस वसाहतीसोबतच नूतनीकरण करण्यात आलेल्या सहयाद्री अतिथी गृहाची  पाहणी केली. वीस वर्षांपूर्वी आपण येथे आलो होतो त्यावेळची आठवण एसपी संदीप पाटील यांना करून देत आताचे अतिथीगृह व तेव्हाचे अतिथीगृह यात मोठा फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाबळेश्‍वर शहरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी असून राज्यात सर्वत्र होत असलेले चेन स्नॅचिंग, पाकिट मारी, महिलांची छेडछाड असे गुन्हे येथे होत नाहीत. रात्री अपरात्री पर्यटक येथे आरामात फिरून पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. महाबळेश्‍वर व पाचगणी या पर्यटन स्थळांसाठी पर्यटन पोलिस ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या विभागासाठी 45 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी महाबळेश्‍वर व पाचगणीसाठी वाहतुक आराखडा तयार केला असून  या विभागात कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस सज्ज आहेत, असे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पारठे यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी मानले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, उपनगराध्यक्ष अफजल सुतार मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

माथूर यांचा मोठेपणा...  

पोलीस कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उदघाटन सतीश माथुर यांनी स्वतः न करता हे उद्घाटन वाई उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांना करावयास सांगून मनाचा मोठेपणा दाखवून दिला.