Mon, May 20, 2019 20:54होमपेज › Satara › कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री

कोल्ड स्टोअरेजला सवलतीत वीज : मुख्यमंत्री

Published On: Mar 01 2018 7:38PM | Last Updated: Mar 01 2018 7:34PMसातारा : प्रतिनिधी

शेतीमालासाठी असलेल्या कोल्ड स्टोअरेजला सवलतीच्या दरात वीज देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ५०० मेगावॅट सौर उर्जा तयार करण्यासाठी राज्य सरकारने टेंडर मागवले आहे. त्या माध्यमातून राज्यातील कोल्ड स्टोअरेजला कमी दरात वीज देता येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, बीव्हीजीने साकारलेल्या राज्यातील पहिल्या मेगा फुड पार्कचे उद्घाटन सातार्‍यात झाले. 

यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संजय काका पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड उपाध्यक्ष उमेश माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

ना. फडणवीस म्हणाले, सातारा मेगा फुड पार्कमुळे शेती व फलोत्पादनाचे क्षेत्र बदलेल. शेतमालाची योग्य साठवणूक होत नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होते. तसेच योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, या फुड पार्कमुळे शेतमालावर प्रक्रिया होणार असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. किसान संपदा योजनेतून शेती क्षेत्रातील सर्व उणीवा भरून निघाल्या आहेत. तसेच ज्या गोष्टी सुटल्या आहेत त्याला पूरक अशी योजना राज्य सरकारने तयार केली आहे. हणमंत गायकवाड यांनी नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मदत केली आहे. यामुळे जैविक पध्दतीने उत्पादन वाढत आहे. शेतीवरील संकटे दूर करण्यासाठी तंत्रज्ञान आणावे लागेल, असेही ते म्हणाले. 

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्याचाच सातारा मेगा फूड पार्क हा एक घटक आहे. या फुड पार्कमुळे परिसरातील 25 हजार शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळणार आहे. यामुळे पंतप्रधानांचे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. खा. शरद पवार हे कृषीमंत्री असताना फुड पार्कची संकल्पना अमलात आणली गेली होती. या क्षेत्रात आतापर्यंत तब्बल 1 लाख कोटी रूपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगांबाबत सकारत्मकता दिसून येत आहे. देशात कोट्यवधी रूपयांच्या अन्न धान्याची नासाडी होते. यामुळे अन्नधान्याची कमतरता होत असल्याने महागाई वाढते. या उद्योगामुळे महागाई आटोक्यात येईल. 

खासदार शरद पवार म्हणाले, राज्यातील पहिला फुडपार्कचा प्रकल्प सातार्‍यातून सुरू होत आहे. बीव्हीजीच्या कामाच्या दर्जामुळेच हणमंतराव गायकवाड यांच्याकडे महत्वाची कामे देण्यात आली आहेत. देशात प्रतिवर्ष 50 हजार कोटी रूपयांचे अन्नधान्याचे नुकसान होते. त्यामुळे अन्न धान्य साठवणूकीसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. जगाच्या बाजारपेठेचा विचार करूनच फुड पार्क ही संकल्पना आणली. सरकारने शेतकर्‍यांच्या मालाची योग्य साठवणूक व्हावी यासाठी पायाभूत सुविधा करणे आवश्यक आहे. सातार्‍यात फुड पार्क झाल्याची माहिती बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी गुंतवणूक वाढून रोजगार उपलब्ध होतील. राज्यामध्ये कोल्ड स्टोरेजसाठी वीजेचे दर जास्त आहेत. त्याबाबत सरकारने सवलतीत वीज देण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात हणमंतराव गायकवाड म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया होत नसल्याने हे फुडपार्क तयार केले आहे. या उद्योगासाठी सातारा हे ठिकाण चांगले आहे. बीव्हीजीने तयार केलेल्या हर्बल नॅनो टेक्नॉलॉजीमुळे उत्पादनामध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सातार्‍याचा फूड पार्क हे वेगळे असून यामध्ये सर्व उद्योगांचा समावेश आहे. येथे येणार्‍या उद्योजकांना केवळ जागाच नव्हे तर कच्चा माल आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. 

प्रारंभी मेगा फुड पार्कचे उद्घाटन झाल्यानंतर बीव्हीजीच्यावतीने हणमंतराव गायकवाड, वैशाली गायकवाड, उमेश माने, मोहिनी माने यांनी स्वागत केले.

हणमंतराव मानलं तुम्हाला : खा. पवार

शरद पवार यांनी आपल्या भाषणात हणमंतराव गायकवाड यांचे तुफान कौतुक केले. ते म्हणाले, देशाच्या संसद भवनाचीही जबाबदारी हणमंतरावांकडे आहे. राष्ट्रपती भवनाची जबाबदारी हणमंतरावांकडेच आहे. एवढेच कायं जिथे कुणाला एन्ट्री मिळत नाही. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराची जबाबदारीही हणमंतरावांकडेच आहे. मानलं रावं तुम्हाला हा गडी कुठे घुसेल याचा नेम नाही! त्याच वेळी हणमंतरावांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. या दोघांचे सहकार्य ज्याला मिळाले तो नशिबवानच म्हणायचा. त्यामुळे तुम्हाला खरोखरच मानले पाहिजे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

सातार्‍यातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सातारा परिसरातील एमआयडीसीतील कारखाने का टिकत नाही. याच्या कारणावर आता मी बोलत नाही. ते सर्व माझ्या कानावर आहे. शेतकर्‍यांसाठी उभारलेला हा प्रकल्प टिकण्यासाठी वाढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. दोन्ही राजांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. त्याचवेळी हणमंतराव काळजी घ्या असे सांगायलाही ते विसरले नाहीत.