होमपेज › Satara › ‘मानिनी’मुळे महिलांचे जीवनमान उंचावेल

‘मानिनी’मुळे महिलांचे जीवनमान उंचावेल

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:55PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

डिमार्ट हे धनिकांचे आहे मात्र मानिनी जत्रा ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिला बचतगटांची असून यामधूनच महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले.

सातारा जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत जि.प. मैदानावर आयोजित केलेल्या मानिनी जत्रेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, माजी नगरसेविका सुवर्णा पाटील उपस्थित होते.

वसंतराव मानकुमरे म्हणाले, एकाच छताखाली सर्व वस्तू रास्त दरात मिळत असल्यामुळे मॉलमध्येच खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. महिला बचतगटांनी उत्पादित केलेला  माल स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मालाला चांगल्या प्रकारचे मार्केटिंग केले पाहिजे.  डॉ. कैलास शिंदे म्हणाले,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या ग्रामोद्योगाला  चालना देण्याचे काम करत आहे. आजही महिला बचतगट पापड, लोणची, मसाल्याचे पदार्थ तयार करताना दिसत आहेत मात्र एवढ्यावर  समाधान न मानता बचतगटांचे फेडरेशन क्‍लस्टर तयार करून त्यांना मोठा उद्योग दिला पाहिजे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या    

महिला बचतगटांकडून लावण्यात आलेल्या  विविध खाद्यपदाथार्र्ंच्या स्टॉलमुळे  राज्यभरातील खाद्यसंस्कृतीची ओळख मानिनी जत्रेच्या माध्यमातून सातारकर नागरिकांना होत आहे. सौ. वनिता गोरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ.नितीन थाडे यांनी मानिनी जत्रेची संकल्पना विषद केली.  कार्यक्रमास  नलिनी जाधव, अलका पाटील, विविध बँका, सहकारी संस्था, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते मानिनी जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. 

मानिनी जत्रेत 160 स्टॉल

मानिनी जत्रेत सुमारे 160 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मातीची भांडी, पापड, लोणची, हातसडीचे तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या चटण्या, सेंद्रीय गूळ, काकवी, चप्पल, गारमेंट, झुट बॅग, प्लास्टिक बॅग, स्ट्रॉबेरी, जॅम, जेली, ड्रेस, घोंगडी, चिवडा, फरसाणा यासह विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच जळगावचे मांडे, पुरणपोळी, थालीपीठ, मटण थाळी, चिकण थाळी, बिर्याणी, मच्छी, कोंबडी वडे आदी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर खव्वैयांनी गर्दी केली होती.