Sat, Dec 14, 2019 03:30होमपेज › Satara › देशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील 

देशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील 

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

शोषणमुक्त समाजासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र दिले असून या संविधानाचा जागर करावयाचा आहे. मात्र, देशाचा कारभार संविधानविरोधी चालला आहे, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे - पाटील यांनी व्यक्त केले.

शाहू कलामंदिर येथे क्रांती थिएटर्सच्यावतीने आयोजित संविधान जागर अभियान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी आचार्य रतनलाल सोनग्रा होते. यावेळी घटनातज्ञ डॉ. सुरेश माने, डॉ. शिवाजी पाटील, प्राचार्या डॉ. सुजाता पवार, पार्थ पोळके, अमर गायकवाड उपस्थित होते.

बी. जे. कोळसे-पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक व्यवस्था होती. न्याय देताना जे जजमेंट झाले त्याचे पार्लमेंटमध्ये कायदे झाले. जे आम्ही केले ते कोणीही भविष्यात करू शकणार नाही. सध्या समाज गटागटात विभागला आहे, हे भयानक वास्तव आहे. भांडवलदार आणि ब्राम्हण्यवाद समाजाला कुरतडतोय. शाहू, फुले, आंबेडकर कोणी शिकवलेच नाही. ज्यांना कळले त्यांनी हे सांगितलेच नाही. मोदींनी चार वर्षांत 20 लाख कोटी रुपये उद्योगपतींना दिले. दलित, मुस्लिम, अदिवासी आज टार्गेट आहेत.संविधान बदलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवादी  या चार स्तंभावर संविधान अवलंबून आहे. 

देश हा सार्वभौमत्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याकडे कोणी पहावयाचे नाही हे मनुवादी धोरण आहे. हिंदुत्ववादी गुन्हेगारांना डिवचण्याचे प्रकार सध्या सुरू असून या गुन्हेगारांना सोडवण्याचे काम सीबीआय करत आहे. देशात अशांतता नांदावी यासाठी एक वर्ग कार्यरत आहे. देशाचे मालक म्हणवणार्‍यांनी बाबासाहेबांना घटना समितीत यायला विरोध केला. घटना, राष्ट्रध्वजही जाळले. आंबेडकर, नेहरूंची बदनामी करणारे हे मनुवादी आहेत.राजकीय समता हे ढोंग व मोठी फसवणूक आहे. कारण सर्वसामान्य माणूस निवडणुकीला उभा राहू व निवडणूक लढवूही शकत नाही.संविधान जागर अभियान परिषद फार महत्वाची आहे.

संविधानाबरोबरच जीवन जगायला जेव्हा कळेल तेव्हाच बाबासाहेबांचे नाव घ्यायचा अधिकार तुम्हा आम्हा सर्वांना असून प्रत्येकाने चळवळीसाठी सर्वस्व अर्पण करावे. यावेळी सुजाता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अमर गायकवाड यांनी परिषदेची भूमिका विशद केली. परिषदेमध्ये राजकीय समतेद्वारे सामाजिक समता प्रस्थापित करणे कसे शक्य आहे? या विषयावर परिसंवाद झाला. दुपारच्या सत्रात खुले अधिवेेशन झाले. ईव्हीएम मशिन मतदानाकरता वापरणे किती बरोबर किती चूक या विषयावर खुर्ली चर्चा झाली. यावेळी क्रांती प्रेरणा लहुजी वस्ताद साळवे सेक्युलर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तिसर्‍या सत्रात प्रबुध्द रंगभूमी निर्मीत  संवाद युगनायकांचा हे नाटक सादर करण्यात आले.