होमपेज › Satara › राज्यात कुणाचा कुणाशीही मधुचंद्र

राज्यात कुणाचा कुणाशीही मधुचंद्र

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 9:37PMखटाव : प्रतिनिधी 

राज्यात सध्या कुणाचा कुणाशीही मधुचंद्र सुरु आहे. घड्याळ्याच्या काट्यावर इंजिन धावू लागल्याचे  परवाच्या पुण्यातील  मुलाखतीवरून दिसून आले. त्यामुळे राजकारणात धनुष्यबाण कुणी हाती घेतले, घड्याळ आणि त्याचे काटे कुठे चालले आहेत, इंजिनात कोळसा टाकलाय किंवा नाही, हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपच्या  लोककल्याणकारी  योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन करतानाच खटाव-कोरेगाव या दुष्काळी मतदारसंघात कमळच फुलेल, असा विश्‍वास भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांनी व्यक्त केला.

कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाच्या भाजप पक्ष  कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत  त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, अतुल कुमारजी, नरेंद्र राऊत, संतोष जाधव,जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य निलादेवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पूनम  महाजन पुढे म्हणाल्या, विरोधकांनी राजर्षी शाहू, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उपयोग मतांच्या राजकारणासाठीच केला. खटाव-कोरेगाव मतदार संघातील   विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवून या भागातील जनतेसाठी पाणी आणण्याची धमक केवळ महेश शिंदे यांच्यामध्येच असून त्यामागे भाजपाची मोठी ताकद उभी आहे. युवा नेते महेश शिंदे व सहकार्‍यांचे या मतदार संघातील कार्य चांगले असून त्यांनी आणखी युवक संघटीत करुन या भागात कमळ फुलविण्यासाठी कामाला लागावे, असे  आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले, भारतीय जनता पक्ष नेहमीच कर्तृत्ववान व्यक्तीच्या नेतृत्वगुणांना वाव देत आला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला  भरभरून प्रतिसाद दिला. याचाच अर्थ पक्ष घेत असलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत आणि म्हणूनच भविष्यातही  पक्षाला अच्छे दिन येणार आहेत.

यावेळी मतदार संघात   कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकर्‍यांचा  पूनम महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन राहुल यादव यांनी केले. यावेळी कोरेगाव-खटाव मतदार संघातील भाजपा ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

जिहे-कठापूरला सुप्रमा देऊन दुष्काळी शेतकर्‍यांना दिलासा दिला : युवक नेते  महेश शिंदे 

खटावच्या पवित्र भूमिने देशाला लक्ष्मणराव इनामदारांसारखे फार मोठे मार्गदर्शक दिले. पंतप्रधान  नरेंद्र मोदींसारख्या हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम त्यांनी केले. महान मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्य या ठिकाणी सुरु आहे. कार्यक्षम युवकांची जडण घडण, शेतकर्‍यांचे जीवन समृध्द बनवणे,सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे या कामांना पक्षाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जात आहे. पक्षाने सत्तेवर येताच या दुष्काळी भागातील  जिहे-कठापूर योजनेला सुप्रमा  देऊन इथल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला.  याउलट विरोधकांनी या योजनेची आणि  जनतेची क्रुर चेष्टाच केली असल्याचे युवा नेते महेश शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पाणी आणण्याची धमक केवळ भाजपमध्येच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने  सलग  15 वर्षे सत्ता भोगली, जनतेला त्यांनी लुबाडले आणि ते निघून गेले. गेली साठ वर्षे विरोधकांनी खटाव-माणच्या जनतेला पाण्याच्या फक्त आशा दाखवल्या. दुष्काळी भागात पाणी आणण्याची ताकद केवळ भारतीय जनता पक्षातच असल्याचे खा. महाजन म्हणाल्या.