होमपेज › Satara › बामणोली आरोग्य केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

बामणोली आरोग्य केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:16PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली (कसबे ता.जावली) येथील कनिष्ठ सहायक तथा लिपिक साहेब नागनाथ नागुलवाड (सध्या रा. श्री व सौ.अपार्टमेंट, शाहूनगर, सातारा मूळ रा.गुणीपूर जि.नांदेड) याने 850 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी)  अटक केली. दरम्यान, याप्रकरणी त्याच विभागातील आरोग्य सेविकेने तक्रार केली आहे.

पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आरोग्य सेविका महिलेला त्यांच्या दप्‍तर तपासणीसाठी लिपिक साहेब नागुलवाड याने 850 रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार महिलेने सातारा एसीबीकडे दि. 19 सप्टेंबर रोजी तक्रारअर्ज केला. तक्रार अर्ज आल्यानंतर सातारा एसीबी विभागाने तो पडताळणी केला असता पैशाची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, लाचेची मागणी झाल्यानंतर ती स्वीकारली जात नसल्याने अखेर दि. 13 डिसेंबर रोजी साहेब नागुलवाड याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बयाजी कुरळे, पोलिस हवालदार बनसोडे, शिंदे, सपकाळ, शिंदे, साळुंखे, कर्णे, राजे, काटकर, खरात, कुंभार, जमदाडे, माने यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.