होमपेज › Satara › मुख्याधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्याधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 11:43PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये  मुख्याधिकार्‍यांच्या दालनात एकाने अंगावर रॉकेल ओतून कुटुंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (23 रोजी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक घडलेल्या या प्रकाराने कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. राजासाब दस्तगीर आत्तार (वय 47) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राजासाब आत्तार हे कुटूंबातील महिलांसह नगरपंचायत कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या हातात रॉकेलचा कॅन होता. त्यामुळे नगरपंचायतीचे कर्मचारी पांडूरंग बर्गे, कामानिमित्त नगरपंचायतीमध्ये आलेले भाजपाचे पदाधिकारी तानाजी देशमुख हे त्यांच्या पाठीमागेच होते. आत्तार यांनी थेट मुख्याधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश करून जोरजोरात आरडाओरडा करून काही कळण्यापुर्वीच मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याचवेळी नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी राजासाब आत्तार यांच्या हातातील रॉकेलचा कॅन व काडेपेटी काढून घेत त्याला ताब्यात घेतले. ही बाब पोलिसांना कळविल्यानंतर मलकापूर बीटचे पोलिस कर्मचारी पन्हाळे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत राजासाब आत्तार हा तेथून पसार झाला होता. तर आत्तार याने आणलेला रॉकेलचा कॅन तेथेच मुख्याधिकार्‍यांच्या टेबल समोरील खुर्चीवर पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. 

दरम्यान, घडलेला प्रकार गंभीर असून संबंधिताविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगितले. दळवी म्हणाल्या, गेली तीन ते चार वर्षांपासून राजासाब आत्तार यांच्या घरातील सांडपाणी त्यांच्या शेजारी असलेल्या नागरिकांच्या घरातील किचनमध्ये झिरपत आहे. त्यामुळे शेजारच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत आत्तार यांनी स्वत:च्या घरातील सांडपाण्याची सोय करावी म्हणून अनेकवेळा त्यांना तोंड व लेखी सांगतले होते. मात्र, त्याबाबत आत्तार यांनी कोणतिही उपाययोजना केली नाही. त्यामुळे आम्ही नगरपंचायतीच्या वतीने त्यांना नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी काहीही गेले नसल्याने शेवटी नगरपंचायतीने कारवाई म्हणून आत्तार यांचे नळ कनेक्शन कट करण्याचा निर्णय घेतला. तशी नोटीसही आत्तार यांना पाठवली होती. त्यानुसार नगरपंचायतीचे कर्मचारी आत्तार यांच्या घरी नळ कनेक्शन कट करण्यासाठी गेल्यानंतर आत्तार यांनी नगरंपचायतीमध्ये येऊन गोंधळ घातला. 

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या वतीने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांना  कोणतीही पूर्वकल्पना न देता संबंधिताने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार जी कारवाई करणे गरजेचे आहे ती आम्ही करणार आहे.