Tue, Jul 16, 2019 14:20होमपेज › Satara › प्रतिपंढरपूर करहरनगरी आज दुमदुमणार

प्रतिपंढरपूर करहरनगरी आज दुमदुमणार

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 8:59PM- इम्तियाज मुजावर
 

पंढरीची वारी ही नुसती प्रथा नाही तर तो एक चमत्कार आहे. विठ्ठलभेटीच्या ओढीने लाखो वारकरी विविध ठिकाणांहून पायी निघतात. आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. बरोबर आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरीत जमा होतात. आज गोरगरीबांची पंढरी म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रात पंढरपूरनंतर जावली तालुक्यातील करहरचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरनंतर  महाराष्ट्रात जावली तालुक्यातील करहर येथेच विठ्ठल भक्तांचा लाखोंचा मेळा जमतो. हा सोहळा पाहिला की ‘हीच माझी पंढरी’चा अनुभव तमाम वारकर्‍यांना येत असतो. करहरच्या प्रसिद्ध श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देवस्थानच्या भक्तीचा हा महिमा...

आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील सर्व विठ्ठल मंदिरे भाविक भक्तांनी ओसंडून वाहतात. मात्र, जावली तालुक्यातील लक्ष्मीपेठ, करहरनगरी येथे श्री विठ्ठल -रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भक्तजणांचा मेळा तेथे जमतो. प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या करहरनगरीत लाखो विठ्ठलभक्तांचा मेळा ‘ग्यानबा तुकाराम’, ‘जय हरी विठ्ठलनामा’च्या घोषात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला दाखल होतात. यादिवशी करहरनगरी विठ्ठलमय होते. भाविक येथील विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन पावन होतात आणि मनात विठ्ठलनामाचा जप करत धन्य होतात.

स्वच्छतेचे  वारकरी संत गाडगेबाबा आणि   कैकाडी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली व ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून ही करहरनगरी प्रतिपंढरपूर करहर म्हणून नावारूपाला आली. प्रतिपंढरपूर करहरनगरीला एकादशीला लाखो वैष्णव भक्तांचा मेळा भरतो. करहर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी यांच्या स्वयंभूमूर्ती आहेत. याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की, करहर येथे एक बहिर्जीनाथ नावाचे गृहस्थ रहात होते. ते विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांचे पंढरपूर क्षेत्र याठिकाणी जाणे-येणे असे. त्यांची पांडुरंगावर फार मोठी श्रद्धा होती. स्वत: ते हरिभक्त पारायण असल्याने भजन, कीर्तन, पायी दिंडी वारी यामध्ये ते नेहमी सामील असायचे. परंतु वार्धक्यात त्यांना पंढरपूरची वारी झेपेना. त्यावेळी बहिर्जीनाथ महाराज यांना एके दिवशी स्वप्नात पांडुरंगाने दृष्टांत दिला की आता तुम्हाला इथे पंढरीला यायला जमत नाही तर आम्हीच तेथे येतो आणि साक्षात खरोखरच स्वयंभू विठ्ठल -रखुमाईच्या मूर्ती या परिसरात प्रकट झाल्या.

निरंजना (कुडाळी) नदीच्या काठावर वसलेले (करहर) हे गाव. त्या गावातील मंडळी केळीचा डोह याठिकाणी आंघोळीसाठी जात. एके दिवशी आंघोळीसाठी बहिर्जीनाथ गेले असता त्यांच्या दोन्ही हातावर दोन मूर्ती वालुकामय प्रकटल्या. स्वप्नात आलेला साक्षात्कार प्रत्यक्ष उमटला हे पाहून बहिर्जीनाथ महाराज व उपस्थित ग्रामस्थ हा चमत्कार पाहून धन्य झाले. याची देही याची डोळा विठ्ठल प्रकटले. तो क्षण त्यावेळच्या ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय होता. त्या मूर्ती घेवून गावकरी व बहिर्जीनाथ गावात येवून एका ठिकाणी पूजाअर्चा केली. तेथेच आज मंदिर उभे आहे. कै.ह.भ.प. कैकाडी महाराज 1953-54 च्या पंढरपूरहून महू येथे किर्तनाच्या कार्यक्रमात आले असताना त्यांना करहर येथील हा चमत्कार कळला. या मूर्तीच्या माध्यमातून पांडुरंगाने दर्शन दिले असे समजल्यावर त्यांनी विठ्ठल  नामाचा जप करत केळीच्या डोहात जावून स्नान केले.

तेथील डोहाची पाहणी करून ह.भ.प. बहिर्जीनाथ महाराजांच्या हातावर प्रकटलेल्या वाळूच्या विठ्ठल-रूक्मिणीच्या मूर्तीची पाहणी करून व माहिती घेवून या डोहा ठिकाणी पद (ओवी) तयार केल्या व करहर या ठिकाणी मंदिरात जावून हा स्वयंभू विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्याच रात्री महू या गावी किर्तनाच्या मोठ्या भंडार्‍याच्या कार्यक्रमात रात्री 9 वाजता ती पद (ओवी) किर्तनाद्वारे गाऊन भक्तांना मंत्रमुग्ध केले. कै. ह.भ.प. गाडगे महाराज व कै. ह.भ.प. कैकाडी महाराज यांचे चरण या भूमिला लागले. त्याच कैकाडी महाराजांचा मठ पंढरपूर येथे आहे. कैकाडी महाराजांनी तब्बल 65 वर्षापूर्वी या करहरनगरीला प्रतिपंढरपूर असे संबोधले तेव्हापासून करहरचे प्रतिपंढरपूर म्हणून मोठे महत्व वाढले.

पुढे काही वर्षांनी संत गाडगेबाबांचे शिष्य व दांडेघरचे सुपुत्र कै. ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पुढाकाराने व दृढ निश्‍चियाने करहर येथे गेली 50 वर्षे आषाढी एकादशीला काटवली, दापवडी, महू-रांजणी, हातगेघर यासह जावलीतून असंख्य पालख्या व  दिंड्या करहरनगरीमध्ये दाखल होतात. तसेच बामणोली, इंदवली, करंदी येथूनही पालख्या दुपारी 1 वाजेपर्यंत करहर येथे जातात. त्या पालख्यांबरोबर लाखो विठ्ठलभक्तांचा मेळा असतो. जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून अगदी कोकणातून भाविक जावलीत दाखल होत असतात. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया।’ याप्रमाणे या जावलीच्या ऐतिहासिक करहरनगरीत उभारलेले हे विठ्ठल-रखुमाई मंदिर ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी पंढरपूर म्हणून ओळखले जाते.