Sat, Jun 06, 2020 01:27होमपेज › Satara › सेवाज्येष्ठतेबाबत अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय

सेवाज्येष्ठतेबाबत अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 12 2019 11:36PM
उंडाळे ः वैभव पाटील

राज्यातील खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठते बाबत राज्य शासनाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली.पण गेल्या दहा ते पंधरा वषार्र्ंपासून निर्माण झालेल्या अतिरिक्त शिक्षक या संकल्पनेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत राज्य शासन अथवा खासगी शिक्षण संस्थांकडून कोणताही ठोस निर्णय  झाला नसल्याने अतिरिक्त शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना आहे. याबाबत अतिरिक्त शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

राज्यातील खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती नंतर शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकानुसार सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाते. संबंधित शिक्षकाने वरिष्ठ पदवी प्राप्त केली तर संबंधित तारखेपासून त्याच्या पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाते. 

महाराष्ट्रात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विद्यार्थी संख्या कमी झाल्याने माध्यमिक, प्राथमिक खाजगी शाळांच्या तुकड्या कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्या शाळेतील किंवा संस्थेतील शिक्षक तुकडी कमी झाल्यानंतर संबंधित शाळेतून अतिरिक्त होतो. अशी अतिरिक्त शिक्षकांचा नवा वर्ग तयार झाला आहे. 

अतिरिक्त शिक्षक म्हणजे विद्यार्थी संख्येच्या अभावाने इतर शाळेत समाविष्ट करणे. यासाठी शासन अतिरिक्त समायोजन ही प्रक्रिया राबवते. त्यानुसार सदर शिक्षकाला एका संस्थेतून अतिरिक्त झाला तर  जिथे जागा रिक्त आहे अशा जागेवर ऑनलाईन  समायोजन करते. 

यानंतर सदर शिक्षकाची सेवाज्येेष्ठता नेमकी कोणती, असा प्रश्न निर्माण होतो. या शिक्षकांना सेवाज्येष्ठता बाबत अतिरिक्त झालेल्या संस्थेत दुय्यम वागणूक दिली जाते. संबंधित शाळेत या अतिरिक्त शिक्षकाच्या अगोदर एक महिना अगोदर नोकरीस   लागला असला  तरीही  सदर शिक्षक हा अतिरिक्त शिक्षकांच्या पेक्षा सेवाज्येष्ठतेला पुढे राहतो. त्यामुळे अतिरिक्त  शिक्षकाने इतर संस्थेत दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे केलेल्या सेवेचा फायदा काय? अतिरिक्त शिक्षक होणे हा त्या शिक्षकाच्या गुन्हा आहे का?  

रयत  किंवा स्वामी  या शिक्षण संस्था शिक्षकांच्या बदल्या सोयीनुसार या शाळेतून त्या शाळेत करतात.त्यावेळी त्यांची सेवाज्येष्ठता ही संस्था गृहीत धरते. अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता इतर संस्थेत गृहीत धरली जात नाही. याबाबत शासन पातळीवर काही निर्णय होणार, याची प्रतीक्षा अतिरिक्त शिक्षकांना लागून राहिली आहे. 

अतिरिक्त शिक्षक म्हणजे बदली झालेला शिक्षक असे संस्थानी  गृहीत धरून सदर शिक्षकांना सेवाज्येष्ठतुनसार मुख्याध्यापक अथवा अन्य पदोन्नती देणे गरजेचे असताना ते टाळले जात असल्याने शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना आहे. 

अधिवेशनात आवाज उठवा..

सेवाज्येष्ठतेबाबत अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व  माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्याकडे आपले गार्‍हाणे मांडले आहे.या दोन्ही आजी-माजी आमदारांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा व  येत्या अधिवेशनात याबाबत शिक्षक आमदारांव्यतिरिक्त अन्य आमदारांनी हा प्रश्न उचलून धरावा अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांनी केली आहे.

अतिरिक्त शिक्षक आपल्या मागण्यांसाठी लवकरच राज्यव्यापी लढा उभारणार आहेत. प्रसंगी न्यायालयात या प्रश्‍नासंदर्भात दाद मागणार आहे- दिलीप खरमाटे, सचिव,  सातारा जिल्हा शिक्षक परिषद