Mon, Apr 22, 2019 12:06होमपेज › Satara › बामणोली भागात अखेर बससेवा सुरू

बामणोली भागात अखेर बससेवा सुरू

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:20PM

बुकमार्क करा

बामणोली : वार्ताहर

यवतेश्‍वर घाटामध्ये रस्ता खचल्याने बामणोली व गोगवे भागातील एस. टी. सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे या भागातील नागरिक, प्रवाशी यांचे हाल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अखेर बामणोली गोगवे येथे बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, अन्य मार्गांवरही बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी यवतेश्‍वर घाटातील रस्ता खचला होता. त्यामुळे कास व बामणोलीकडे जाणार्‍या मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, एक लेन तयार झाल्यानंतर मोठी वाहनेही जात होती. मात्र, एस. टी.ला जाण्यास मज्जाव केल्यामुळे बामणोली भागातील नागरिक व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. यावर पर्याय म्हणून सातारा आगाराकडून छोटी यशवंती बसही सुरू करण्यात आली. मात्र, ही बससेवाही मध्येच कोलमडून पडल्याने नागरिकांची रहदारी कमी झाली होती. 

बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी दै.‘पुढारी’ने वारंवार पाठपुरावा केला होता. याप्रकरणी विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांच्याकडे वारंवार तक्रारीही जात होत्या. त्यानंतर बांधकाम विभागाने या बामणोली-गोगवे मार्गावर एस. टी. बस सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र सातारा आगाराला दिले होते. त्यानंतरही ताम्हणकर यांनी बससेवा सुरू न केल्याने दै.‘पुढारी’ने या भागातील नागरिक व प्रवाशांच्या व्यथा मांडल्या होत्या.

त्यानंतर अखेर कास बामणोली गोगवे या मार्गावर बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील यवतेश्‍वर, सांबरवाड़ी, आनावळे, पेट्री, अंबाणी, देवकल, पारंबे, आटाळी, कास, अंधारी, फळणी, सावरी, म्हावशी, तेटली, केळघर, आपटी, वाकी, निपानी, फुरूस, हात्रेवाडी, रामेघर, वारसोळी, गोगवे या भागातील प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले आहे. याबद्दल त्यांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले.  यात्रा हंगामात लाल परी सुरु झाल्याने मुंबईकर मंडळी व कास बामणोली परिसरातील जनतेची खोळंबलेली दळणवळणाची सोय झाली.