Wed, Mar 20, 2019 02:32होमपेज › Satara › अपशिंगे राज्यात आदर्श ग्राम करणार 

अपशिंगे राज्यात आदर्श ग्राम करणार 

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:04PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

अपशिंगे हे गाव सैनिकांचे गाव असल्यामुळे या गावाकडून अनेकांना प्रेरणा मिळण्यासारखे आहे. त्यासाठी या गावाचे सुशोभिकरण करण्यावर भर आहे. त्याचप्रमाणे विविध विकासकामे राबवून अपशिंगे हे गाव राज्यात आदर्श ग्राम म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही सहपालक मंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आमदार आदर्श ग्राम अंतर्गत अपशिंगे (मिलीटरी) विविध विभागांच्या अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले, अपशिंगे (मि.) येथे नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले असून जननी सुरक्षा योजनेची अंमलबजावणी  केली आहे. 26 जानेवारीला विकास कामांचे भूमिपूजन गावात होणार आहेत. त्यामध्ये विविध कामांचा समावेश आहे. गावात  कृषी विभागाच्या अंतर्गत ट्रॅक्टर व मळणी यंत्राचे वाटप करण्यात आले असून बंधार्‍यांची कामे प्रगती पथावर आहेत. जि. प. शाळेत डिजीटल क्लास सुरु करणे, गावात सौर उर्जेचे पथदिवे बसविणे, स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे, नाले काढणे आणि दुरुस्ती,  या कामाचा आढावा घेण्यात आला. प्रस्तावित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ना. खोत यांनी दिले. 

अपशिंगे गावातील प्रत्येक घराच्या अंगणात एक झाड लावण्याचे आवाहन त्यांनी गावकर्‍यांना केले. दरम्यान, गावाच्या दर्शनी भागात रणगाडा ठेवण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून कार्यवाही सुरु असल्याचेही ना. खोत यांनी सांगितले.