Thu, Jan 17, 2019 17:43होमपेज › Satara › जिल्ह्यातील ७० गावांत हरभरा पिकावरील कीड, रोग सर्वेक्षण सुरू 

जिल्ह्यातील ७० गावांत हरभरा पिकावरील कीड, रोग सर्वेक्षण सुरू 

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:46PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

हरभरा पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील हरभरा पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणाचे कामकाज सुरू करण्यात आले असून त्यासाठी सातारा जिल्ह्यातील 70 गावांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 7 कीड सर्व्हेक्षक व 1 कीड नियंत्रकामार्फत सर्वेक्षण सुरू असून निवड केलेल्या गावातील कीड व रोग सर्वेक्षणाची माहिती आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे एम क्रॉपसॅप मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येत आहे. 

कृषि विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या उपाययोजना दर सोमवारी व गुरूवारी शेतकर्‍यांना मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवल्या जात असल्याची माहिती जिल्हा समन्वयक विठ्ठलराव भुजबळ यांनी दिली. 

हरभरा पिकाचे घाटे अळीमुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते. या किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरी 15 ते 20 पक्षी थांबे उभारावेत. त्याचप्रमाणे एकरी 5 कामगंध सापळे लावावेत त्यामुळे किडीचे नेमके प्रमाण कळते. यावरून आपणाला किटक नाशक फवारणी करण्याची वेळ ठरविता येते. 

पिक 3 आठवड्यांचे झाल्यानंतर हरभरा पिकावर बारीक अळ्या दिसून येत  असल्यास  5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.