Mon, Apr 22, 2019 23:59होमपेज › Satara › फलटणमध्ये ‘अन्‍न औषध’चा छापा

फलटणमध्ये ‘अन्‍न औषध’चा छापा

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:30PMफलटण : प्रतिनिधी

फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात अन्‍न व औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता छापा टाकला. या छाप्यात 15 प्रकारच्या गुटख्यांचे बॉक्स व पोती आढळून आली. या कारवाईत एकूण 1 लाख 35 हजार 865 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणी व्यापारी महेंद्र कुडूंबर याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ही कारवाई मॅनेज झाली असल्याचीही चर्चा परिसरात सुरू होती. 

फलटणच्या लक्ष्मीनगरात असणार्‍या महेंद्र आरमोगम कुडूंबर या व्यापार्‍याकडे अवैध गुटखा असल्याची माहिती अन्‍न औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांचे सहकार्य घेत त्या व्यापार्‍याच्या बंगल्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता छापा टाकला. या छाप्यात अधिकार्‍यांनी बंगल्याची तब्बल 5 तास झाडाझडती घेतली. अन्‍न औषध विभागाचे सौ. आर. ए. खापणे,सौ. एम.एस. पवार, नमुना सहाय्यक एस.आर. सर्वगोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोमले, दोन सरकारी पंच तसेच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सौ. एस.आर. कदम, एस.डी. सूळ, डी.पी. सांडगे यांनी पंचनामा करून माल जप्त केला. 

कुडूंबर हा प्रथम बॉबी विकण्याचा व्यवसाय करत होता. त्यानंतर दुय्यम प्रतीचे खाऊचे पुडे विकून बक्‍कळ पैसा कमवला होता. त्यानंतर अधिक पैसा मिळवण्यासाठी अवैधरित्या गुटख्याची विक्री त्याच्याकडून होत होती. या पैशातून त्याने तीन वाहने घेतली होती. तालुक्यात गुटख्यावर बंदी असल्याने या वाहनामधूनच चढ्या भावाने गुटख्याची विक्री तो करत होता. 
शासनाने गुटख्यावर बंदी घातल्यापासून तालुक्यात गुटख्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे. अन्‍न औषध प्रशासनाला फक्‍त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला जातो. यापूर्वी रिंगरोड, रविवार आणि जिंतीनाका परिसरात छापे टाकण्यात आले होते. दरम्यान, फलटणमध्ये फक्‍त माहिती मिळाल्यानंतरच कारवाई केली जाते. इतरवेळी खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असताना हेच अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपले हात आले करत असल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायाला पाठबळ मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामध्ये कमी मुद्देमाल पकडून जुजबी कारवाईचे स्वरूप देऊन मोकळे व्हायचे असेच अधिकार्‍यांचे उपदव्याप सुरू आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.