Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Satara › अशोकराव थोरात यांची माहिती; ६ जानेवारीला आंदोलन

सातार्‍यात शिक्षण संस्था संघाचा मोर्चा

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:11PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्राबाबत घेतल्या जाणार्‍या राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूद्ध सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघासह जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 6 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली आहे.

राज्य शासनाने गेल्या काही वर्षामध्ये अशैक्षणिक निर्णय घेतले आहेत. यामुळे गरीब, कष्टकरी, मागासवर्गीय व इतर समाजातील मुला - मुलींचे शिक्षण अवघड झाले आहे. आता तर दहापेक्षा पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढेही असेच निर्णय घेत शिक्षणाचे खाजगीकरण, कंपनीकरण सुरू राहणार आहे. 

विनाअनुदानित शाळा व शिक्षकांचे  प्रश्‍न, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या भरतीचे प्रश्‍न, वेतनेत्तर अनुदान, महाविद्यालयाच्या समस्या, पॉलिटेक्नीक, आयटीआयच्या समस्या, जिल्हा परिषदेसह शासकीय शाळातील शिक्षक व शाळांचे प्रश्‍न याबाबत वारंवार लक्ष वेधूनही शासनाने कोणतेही ठोस सकारात्मक निर्णय घेतलेले नाहीत. तसेच ज्या गावातील शाळा बंद होणार आहेत, त्या गावाचे सरपंच, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांच्यावरही या निर्णयामुळे अन्याय होणार आहे. 

म्हणूनच सातारा येथील मोर्चात समाजातील सर्व घटकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. शनिवार, 6 जानेवारीला दुपारी दोन वाजता हा मोर्चा गांधी मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे, असेही थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.