होमपेज › Satara › ऐन उन्हाळ्यात महाबळेश्‍वरमध्ये हिमकण (video)

ऐन उन्हाळ्यात महाबळेश्‍वरमध्ये हिमकण (video)

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 24 2018 7:45AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये गेले दोन-तीन दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. येथील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरामध्ये दवबिंदूचे हिमकणामध्ये रूपांतर झाल्याचे दृश्य शुक्रवारी पहाटे पाहावयास मिळाले. शहराचे किमान तापमान 10 अंश, तर वेण्णा लेक ते लिंगमळा परिसरामध्ये  3 ते 4  अंशपर्यंत पारा उतरला. त्यामुळे वेण्णा लेक व लिंगमळा परिसराने हिमकणांची चादर पांघरल्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असताना थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेले महाबळेश्‍वर मात्र याला अपवाद ठरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाबळेश्‍वरवासीयांसह पर्यटकांना अचानक     हवामानात बदल झाल्यामुळे सुखद गारवा अनुभवण्यास मिळत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पहावयास मिळत आहेत. शहरातील तापमानामध्ये सतत चढ उतार होत असून वेण्णालेक व जवळच असलेल्या लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा मोठा कडाका जाणवत आहे.

या थंडीमुळे सूर्यास्तावेळी पर्यटकांना विविध रंगी सूर्यास्त पाहण्यास मिळत आहे. तसेच स्थानिकांसह येथे पर्यटनास आलेले पर्यटक या अचानक वाढलेल्या थंडीमुळे स्वेटर्स व शाली पांघरून बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना पहावयास मिळत आहेत. महाबळेश्‍वर शहराचे किमान तापमान 10 अंश तर वेण्णालेक ते लिंगमळा परिसरामध्ये 3 ते  4 अंशपर्यंत पारा उतरला आहे. 

या कडाक्याच्या थंडीमुळे शुक्रवारी पहाटे प्रसिद्ध वेण्णालेक व स्ट्रॉबेरी करता प्रसिद्ध असलेल्या लिंगमळा परिसरामध्ये दवबिंदूंचे हिमकणामध्ये रूपांतर झाल्याचे दृश्य पहावयास मिळाले. वेण्णालेक व लिंगमळा  या एक किमीच्या परिसरामध्ये वाहनांच्या टपांवर, नौकाविहारासाठी तयार केलेल्या जेटींवर, घरांवरील छपरांवर, स्ट्रॉबेरीच्या मळ्यांमध्ये, झाडाझुडपांसह पानांवर देखील अनेक ठिकाणी हिमकण जमा झाले होते.हिमकण दिसण्याची या वर्षातील ही पहिलीच वेळ असून स्थानिकांसह काही पर्यटकांनी  हिमकण पाहण्याचा व सुखद गारव्याचा वेण्णालेक परिसरात आनंद लुटला.

आणखी दोन दिवस थंडी!

ऐन कडक उन्हाळ्यात महाबळेश्‍वरचे तापमान खाली घसरून 10 अंशावर आल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महाबळेश्‍वरमध्ये गत 35 वर्षामध्ये अशा घटना 5 वेळा घडून गेल्या आहेत. महाबळेश्‍वरवर वायव्य आणि ईशान्य बाजूकडून येणारे थंड वारे जात असल्याने तापमान कमी झाले आहे. आणखी 2 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने म’श्‍वरकरांना उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घेता येणार आहे. दि. 25 रोजी सूर्य विषूवृत्तावर येणार असल्याने पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस सुट्टीमध्ये पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घेता येणार आहे.