Thu, Apr 25, 2019 07:38होमपेज › Satara › विद्युत पोल जाहिरात फलकांच्या विळख्यात

विद्युत पोल जाहिरात फलकांच्या विळख्यात

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 7:25PMसातारा : प्रतिनिधी 

रस्त्याकडेला उभे असलेल्या विद्युत पोलवर विविध प्रकारच्या जाहिराती विनापरवागी झळकत आहेत. जाहिरात फलकाचा नवा फंडा शहरात यामुळे उदयास येत आहे. जागोजागी उभे असलेले विद्युत पोल आता जाहिरात फलकाच्या विळख्यात सापडलेे आहेत. फ्लेक्स जाहिरातीव्दारे लाखो रुपयांच्या कमाईचा नवा फंडा काही व्यवसायिकांनी शोधला आहे. सातारा शहराच्या वेगवेगळया भागात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात फलक विद्युत पोलवर लावले आहेत. वास्तविक रस्त्याकडेला उभे असणार्‍या विद्युत पोलवर जाहिरात फलक लावण्यास मनाई असतानाही बिनबोभाट या जाहिराती लावण्यात येत आहे. त्यामुळे शहराची बकाल अवस्था वाढू लागली आहे. 

अनेकदा विद्युत खंडीत झाल्यावर संबंधित विभागाच्या वायरमनला त्या विद्युत पोलवर काम करावे लागते. अशा वेळी या जाहिरातदारांनी लावलेल्या जाहिरातीचा अडसर  वायरमनना होतो. बर्‍याचदा विद्युत पोलवर जाहिरात फलक असल्याने वायरमनला काम करता येत नाही. याबाबत महावितरणने वारंवार पालिका प्रशासनाला सूचना देऊनही हे फलक हटवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जाहिरातीच्या विळख्यात सापडलेल्या विद्युत पोलची सुटका कोण करणार? असा प्रश्‍न पडला आहे. शहरातील बहुतांश विद्युत पोलवर अशा फुकट्या जाहिरातींनी कब्जा केल्याचे दिसत आहे. 

फ्लेक्स चौका चौकात दिसत आहेत. या फ्लेक्समुळे पालिकेच्या तिजोरीत एकही रूपया पडत नाही. तरीही पालिका या फ्लेक्सकडे सतत दुर्लक्षच करत आली आहे. फ्लेक्सच्या मोठ्या आकाराने अनेक अपघातही होतात. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचीही उदाहरणे आहेत. याचे काहीच देणेघेणे संबंधितांना नसते. जाहिरात फलकामुळे शहराच्या सौदर्याला बाधा तर येतच आहे. परंतू अनेकदा वादळी वारे व पावसामुळे निर्माण होणारे धोके ही वाढत आहेत. अनेकदा विद्युत पोलवर लावलेले हे फलक इतरत्र उडून जात असल्याने बर्‍याचदा रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या नागरिकांच्या अंगावर कोसळतात.त्यामुळे विद्युत पोलवरील जाहिराती काढणे आवश्यक आहे.