Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Satara › गोंधळ झाल्यास दारू दुकान एक महिना बंद करा : आयजी

गोंधळ झाल्यास दारू दुकान एक महिना बंद करा : आयजी

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:39PM

बुकमार्क करा

सातारा/लिंब : प्रतिनिधी

सातार्‍यातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, गल्ली-बोळात होणारे वाढदिवस, अजिंक्यतारा परिसरात फिरणारी प्रेमीयुगले, कॉलेज परिसरातील रोमियोगिरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तथापि, हे प्रकार टप्प्या-टप्प्याने निकाली काढले जातील. दरम्यान, राजवाडा येथील दारु दुकानप्रकरणी गोंधळ झाल्यास अशी दुकाने कारवाई म्हणून महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले.

सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी जिल्हा दौर्‍यावर नांगरे-पाटील आले आहेत. शुक्रवारी पोलिस उपविभागीय कार्यालय व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. बैठकीवेळी आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकार्‍यांच्या कारवाई व पोलिसांचे अधिकार यावरुन ‘शाळा’ घेतली. कारण विविध कारवाईबाबतचे त्यांनी स्वत: पोलिसांना अलर्ट पाठवूनही कारवाई झाली नसल्याचे समोर आले. यामुळे पोलिस आता तरी कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उपस्थित नागरिक, युवक, युवतींनी शाहूनगरमध्ये पोलिस गस्त वाढवावी. अजूनही चौकात वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण कायम आहे. चौकात सायंकाळनंतर दुचाकी, चारचाकी लावून युवक हुल्‍लडबाजी करत असून त्यामुळे  वाहतुकीची कोंडी होते. त्याचप्रमाणे दिवसा अजिंक्यतारा, चारभिंतीच्या, आमराई परिसरात प्रेमीयुगुलांची संख्या वाढू लागली असल्याबाबत गार्‍हाणे मांडले. शहरातील इतर भागातील लोकांनीही विविध प्रश्‍न उपस्थित केले.

नागरिकांच्या तक्रारीवर बोलताना आयजी विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांना विविध सूचना केल्या. अ‍ॅन्टी बर्थ डे स्कॉड स्थापावे. राजवाडा बसस्थानक परिसरात तीन दारुची दुकाने असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. अनेकदा तक्रार करुनही कारवाई होत नाही. त्यावर नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकार्‍याला अशाप्रकारे तक्रारी आल्यातर दारु दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचे अधिकार असल्याचे उपस्थित पोलिसांच्या लक्षात आणून दिले.दरम्यान, यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, सातार्‍यातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, युवती उपस्थित होते.