Tue, May 26, 2020 23:57होमपेज › Satara › निवडणूक लोकसभेची लक्ष्य ‘विधानसभे’चे

निवडणूक लोकसभेची लक्ष्य ‘विधानसभे’चे

Published On: Apr 04 2019 2:04AM | Last Updated: Apr 03 2019 9:00PM
कराड : चंद्रजित पाटील

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेच्या गणितांची राजकीय गोळाबेरीज प्रस्थापितांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेच काही ठिकाणी ‘नाक दाबण्याचा’ तर काही ठिकाणी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे निवडणूक लोकसभेची असली तरी पेरणी मात्र विधानसभेचीच सुरू असल्याचे कराड दक्षिणमध्ये पहावयास मिळत आहे.

2009 साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन कराड, मलकापूर, वडगाव हवेली, घोणशी, वहागाव, सैदापूर असा मोठा कराड उत्तरमधील भूभाग कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. नव्याने समाविष्ट भागात तसेच कराड शहरात राष्ट्रवादी पर्यायाने आ. बाळासाहेब पाटील यांना मानणारा मोठा गट कार्यरत आहे. 2009 साली राष्ट्रवादीने तत्कालीन आमदार विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तर 2014 साली अनपेक्षितपणे राष्ट्रवादीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना साथ केल्याने वारूंजी गटात सुमारे दोन हजार तर कराड शहरात सुमारे 16 हजारांचे मोठे मताधिक्य घेण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना यश मिळाले होते. याशिवाय कृष्णाकाठी राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते, उंडाळे परिसरात उंडाळकर गटापासून फारकत घेतलेल्या जयसिंगराव पाटील गटाला मानणाराही सुमारे 5 ते 10 हजारांचा वर्ग आहे. 

त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण सरसावल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे विलासराव पाटील - उंडाळकर गटाने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीतील अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना आलेले अपयश आणि शिवसेनेचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांनी अडचणीच्या काळात उघडपणे केलेली पाठराखण पाहता हा गट कोणती भूमिका घेणार ? याबाबत उत्सुकता आहे. राजकारणात काहीही शक्य असते आणि काहीही अशक्य नसते, असे म्हटले जाते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या उंडाळकर गटाचे थेट वैरत्वही नाही, हेही फार महत्त्वाचे आहे.  एकीकडे असे असताना भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी मात्र सत्वपरिक्षेचा काळ सुरू झाला आहे. त्यांच्या भूमिकेकडे खासदार उदयनराजे भोसले आणि ना. नरेंद्र पाटील यांचेही लक्ष आहे. कराड शहरात जनशक्ती आघाडी डॉ. अतुल भोसले यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे चित्र दोन वर्षापासून पहावयास मिळत आहे. मात्र या आघाडीतील जाधव गट सध्यस्थितीत जाहीरपणे व्यासपीठावर आलेला नाही. हा गट वगळता माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव गट आणि उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील हे दोन्ही गट खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपाला पाठिंबा देणारे स्विकृत नगरसेवक फारूख पटवेकर हेही उदयनराजे यांच्या व्यासपीठावर दिसतात. सध्य राजकीय स्थिती पाहता डॉ. अतुल भोसले हे पक्षालाच महत्त्व देणार आहेत. मात्र समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगरसेवकांची मने वळवण्याबाबत ते कोणती भूमिका घेणार ? याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या पर्यायाने खासदारांच्या कराड, मलकापूरमधील समर्थकांच्या चुकांवर बोट ठेवत काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यात काँगे्रसला कितपत यश येणार ? भविष्यात काँग्रेसला फटका बसणार की भाजपाला ? याबाबतही तर्कविर्तक सुरू झाले असून लोकसभा निवडणुकीतही विधानसभेचीच गोळाबेरीज सुरू आहे.

चुका दाखवून देण्याचा प्रयत्न ....

आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी बैठक घेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तिसर्‍याच दिवशी आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी या समर्थकांसोबत उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक झाली होती. यावेळी चुका सुधारल्या जातील, असे खासदारांनी सांगितले आहे. त्यामुळेच उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या समर्थकांना विधानसभा निवडणुकीवेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जास्त वळवळ करू देऊ नये, असेच सांगण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न झाल्याची चर्चा कराड दक्षिणेत सुरू आहे.