Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Satara › दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग

दूध व पाणी परिषद घेऊन शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे रणशिंग

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 8:06PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये  दूध व पाणी परिषद घेऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

शेतकरी संघटनेची बैठक जिल्हाप्रमुख बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चव्हाण म्हणाले, साखर कारखान्यांनी रिकव्हरी वाढण्यासाठी चांगल्या ऊस बियाणांचा आग्रह धरावा, तोडणी कामगार व मुकादमांनी आर्थिक फसवणूक केली आहे हे पाहता मजुरांवर विसंबून न राहता छोट्या उसतोडणी यंत्राचा वापर करावा. वाहतुकदारांना दिलेल्या कर्जावर कारखान्यांनी व्याज आकारू नये.

जावली तालुका प्रमुख मनोहर सणस म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या सरासरी रिकव्हरीप्रमाणे वेगवेगळा दर मिळाला पाहिजे. सध्याच्या पध्दतीत उशिराच्या उसाची रिकव्हरी जादा असते, मात्र वजन कमी येते. तरीही दर एकसारखाच मिळतो. म्हणून गुजरात पॅटर्न अंमलात आणावा. उसतोडीसाठी शेतकर्‍यांनी पैसे देऊ नये.

आनंदा महापुरे म्हणाले, भाजप सरकार 17 टक्के पाणी दरवाढ, वीजबिल दरवाढ, घरपट्टी वाढ करून शेतकर्‍यांचे उत्पन्न घटवत आहे. पाणीपट्टी वाढ करण्यापेक्षा पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचार संपवावा.

के. बी. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, जावली, वाई, सातारा तालुक्याच्या रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करणे आवश्यक आहे. 

एकनाथ जाधव म्हणाले, राज्य शासनाने गायीच्या दुधाला 27 रूपये प्रतीलिटर दर देण्याचे आदेश दिलेले असतानाही दूध संस्था 20 ते 22 रुपये प्रति लिटर दर देत आहेत, ही शेतकर्‍यांची लूट आहे. बैठकीला सहकार आघाडी राज्यप्रमुख संजय कोले, शंकर कापसे, अर्जुन जाधव, भानुदास पवार, शशिकांत कदम, बाळासाहेब देसाई, अशोक चव्हाण व प्रमोद कदम, शेतकरी उपस्थित होते.