Mon, Jul 22, 2019 00:51होमपेज › Satara › महाबळेश्वर : आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्यास पकडले

महाबळेश्वर : आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्यास पकडले

Published On: Sep 04 2018 11:32AM | Last Updated: Sep 04 2018 4:11PMमहाबळेश्वर : वार्ताहर

ओझर्डे (ता. वाई) येथील एका दांपत्याचा घरी कुंटुंबासोबत वाद झाला होता. या वादातूनच त्या दाम्पत्याने 'आम्ही महाबळेश्वरला आत्महत्या करायला जात आहे.' असे नातेवाईकांना सांगत हे दाम्पत्य घराबाहेर पडले. याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर निर्भया पथकातील पोलिस आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी त्यांची शोधाशोध करत ऑर्थरसीट पॉईंटवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना त्‍यांना ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न कणाऱ्या दांपत्‍याच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादातूनच या दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी आम्ही आत्महत्या करण्यासाठी महाबळेश्वर येथे जात असल्याचे त्यांनी घरात सांगितले होते. यानंतर घाबरलेल्या नातेवाईकांनी महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. मात्र, हे आत्महत्या करण्यासाठी नक्की कोठे जाणार हे माहीत नव्हते. त्यासाठी पोलिसांनी आणि निर्भया पथकाने ठिक ठिकाणी फिल्डिंग लावली होती. याच दरम्यान हे दाम्पत्य ऑर्थरसीट पॉइंटकडे जात असल्याचे महाबळेश्वर ट्रेकर्समधील एका सदस्याने पाहिले. याची माहिती त्याने पोलिसांना व सदस्यांना दिली. पोलिस त्या ठिकानी यापूर्वीच आले होते. त्यांनी या परिसरात दाम्पत्याचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी पोलिसांना आढळून आली. ते आत्महत्या करण्यासाठी पॉईंटच्या खाली निघाले होते. त्याच वेळी ट्रेकर्स आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

यानंतर त्‍यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. महाबळेश्वर पोलिस आणि ट्रेकर्स यांच्या प्रयत्नामूळे या दोघांचे प्राण वाचले.