Tue, Jun 18, 2019 21:24होमपेज › Satara › कामेरीत बेकायदा वाळू उपशावर छापा

कामेरीत बेकायदा वाळू उपशावर छापा

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 07 2018 12:03AMसातारा/वेणेगाव : प्रतिनिधी

कामेरी (ता. सातारा) येथील बेकायदा वाळू उपशावर बोरगाव पोलिस व महसूल विभागाच्या स्थानिक कर्मचार्‍यांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत नऊ जणांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जेसीबी, टॅ्रक्टर, यारी, वाळूचा साठा असा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बेकायदा वाळू उपशाचे पंचनामे करण्यास सांगून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. संदीप सुगंधराव घाडगे (वय 32), संतोष हरी लोखंडे  (वय 35),  अमोल मच्छिंद्र घाडगे (वय 32), सोमनाथ हणमंत घाडगे (वय 38), रविराज नवनाथ घाडगे (वय 28) सर्व रा.कामेरी  ता.सातारा, राहूल राजाराम घोलप (वय26) रा.फत्यापूर ता.सातारा, प्रकाश आनंदा सोनकांबळे (वय 30, रा. कवडा ता.खंदार जि.नांदेड. सध्या रा. अंगापूर ता.सातारा), संतोष विठ्ठल हट्टेकर (वय26, रा. गोंडाळा, ता. शेणगाव जि. हिंगोली. सध्या रा. अंगापूर ता. सातारा), नितीन चव्हाण (वय 28, रा. कालगाव ता.कराड) यांच्यावर बेकायदा वाळू उपसाप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

कामेरीमध्ये कृष्णा नदीपात्रात वाळू माफियांकडून वारंवार बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. महसूल विभागाने कामेरीत सातत्याने कारवाया केल्या आहेत. कामेरीतील कृष्णा नदीच्या प्लॉट क्रमांक 4  मध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची टीप मिळाल्यानंतर बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी वेषांतर करुन कोरेगाव तालुक्यातील बोरगावमधून कृष्णा नदीतून होडीने प्रवास केला. त्यावेळी कामेरीत कृष्णा नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा सुरु असल्याचे त्यांना आढळले.  पोलिसांनी कारवाई केल्याचे  लक्षात येताच वाळूमाफियांची पळापळ झाली. पोलिसांनी त्यांना ताणून पकडले. या कारवाईत 2 जेसीबी, ट्रॉलीसह चार ट्रॅक्टर, 2 यारी तसेच  3 ब्रास वाळूचा साठा असा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. 
वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी बोरगाव पोलिसांनी वेषांतर करुन होडीतून प्रवास करत रात्रीच्यावेळी धाडसी कारवाई केली. त्यांना महसूल विभागाचीही साथ मिळाल्याने तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. 

सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बोरगाव पोलिस ठाण्यास भेट घेतली. घनास्थळाचे तात्काळ पंचनामे  करुन कारवाई आदेश तलाठी तसेच सर्कलला दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गंत कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून संबंधितांना सुमारे 20 लाखांचा दंड होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी संबंधित तलाठी तसेच मंडलाधिकारी उपस्थित होते.