Tue, Apr 23, 2019 06:29होमपेज › Satara › पाटणमधील  ‘त्या’ गावांना  ‘स्वातंत्र्य ’ मिळालयं ?

पाटणमधील  ‘त्या’ गावांना  ‘स्वातंत्र्य ’ मिळालयं ?

Published On: Aug 13 2018 1:23AM | Last Updated: Aug 12 2018 10:02PMपाटण :  गणेशचंद्र पिसाळ 

स्वातंत्र्य लढ्यात पाटण तालुक्याचा तितकाच महत्त्वाचा सहभाग होता. त्यानंतर सुरू झालेल्या पाणी लढ्यातही पाटण तालुक्याचे योगदान मोलाचे ठरले. परंतु त्यानंतर यातून तालुक्याच्या पदरात काय पडले ? हा अद्यापही संशोधनाचा व चिंतेचा विषय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एवढी वर्षे होवूनही या तालुक्यातील काही गावांना  अद्यापही  पाणी, वीज, रस्ते या मुलभूत नागरी सुविधांचे लढाई लढावीच लागत असेल तर मग हे कसले स्वातंत्र्य ? असा प्रश्‍न अनेक गावातील भूेमिपुत्रांसमोर आ वासून उभा आहे. 

‘स्वातंत्र्य म्हंजी काय रं भाऊ’? हा प्रश्‍न अनेक गावातील वास्तव पाहिल्यावर निर्माण होतो. तालुक्यातील कोयनेसह अन्य धरणे डोंगरपठारांवर हजारो पवनचक्क्यांतून राज्यातील लाखो जनतेच्या जीवनात प्रकाश टाकत तीन राज्यांची तहान भागली. ज्यांच्या त्यागातून हे घडले ते भूमिपुत्र मात्र आजही मुलभूत नागरी सुविधांच्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत हीच शोकांतिका आहे. ‘धरण ऊशाला आणि कोरड घशाला’ अशी चिंताजनक परिस्थिती अनेक गावात पहायला मिळत आहे. एका बाजूला देशात डिजीटल इंडियाचे वारे वाहत असताना येथे अनेक गावात वीजच नाही तर मग नेटवर्क कोठून येणार ? कॅशलेसच्या जमान्यात येथे टीचभर खिसा नसलेल्या कपड्यात जगण्याइतकाही पैसा कधीच मिळाला नसल्याने रोजच्या पोटभर जेवणाची भ्रांत कायम आहे. लहरी निसर्ग, भौगोलिक, नैसर्गिक आपत्तीेंवर मात करत येथे पारंपरिक पिके घेतली जातात. नाचणी, भात यासारखी पारंपरिक पिके वर्षभरासाठी पोटची भूकही शमविण्यात अपयशी ठरतात.      

आजही अनेक गावांना प्यायला पाणी नाही त्यांची हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट सुरूच आहे. काही गावात वीज व्यवस्था दिखाऊ व तकलादू आहे तर महिनोंमहिने वीज गायब हा सातत्याचा प्रकार असतो. अजूनही काही ठिकाणी वीजच पोहोचली नाही तर रॉकेलही इतिहास जमा होत आल्याने त्यावरची कंदील, चिमणीचा उजेडही संबधीतांच्या नशीबात नाही. त्यामुळे त्यांना उजेडाचेही स्वातंत्र्य प्राप्त झालेले नाही. तर दुसरीकडे सार्वत्रिक दुरावस्था पाहता येथे कुपोषणाचे प्रमाणही चिंताजनक आहे. आजही काही ठिकाणी आदिवासी जीवन पहाता यांना किमान स्वातंत्र्य कधी मिळणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. 

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली, कोयनेसारखे महाकाय धरण होवून साठ वर्षे झाली ही वस्तूस्थिती असली तरी येथे आजही निवडणूका रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या किमान मुलभूत नागरी सुविधांवरच लढविल्या जातात. आपल्या सर्वस्वाचा त्याग करूनही  प्रकल्पग्रस्तांना न्याय, हक्क, स्वातंत्र्य तीन पिढ्यांनतंरही मिळवून देण्यात शासन, प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे  किमान जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे का ? याचा सार्वत्रिक विचार व्हावा एवढीच अपेक्षा येथील भरडलेली जनता व्यक्‍त करीत आहे.