Fri, Jul 19, 2019 20:35होमपेज › Satara › मोती, मंगळवार तळ्यांत यंदाचे मूर्ती विसर्जन

मोती, मंगळवार तळ्यांत यंदाचे मूर्ती विसर्जन

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहर व परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यंदा मंगळवार व मोती तळ्यांमध्ये होणार आहे. मात्र, याबाबत उच्च न्याायलयात शपथपत्रे दाखल केली जाणार असून, त्याच्या सुनावणीला वेळ झाला तर मात्र विसर्जन गोडोली येथील तळ्यात करण्याचे शांतता कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेत ठरवण्यात आले. 

येथील पोलिस करणमूक केंद्रात सोमवारी दुपारी पाच वाजता बकरी ईदनिमित्त शांतता कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोनि नारायण सारंगकर, पोनि किशोर धुमाळ उपस्थित होेते.

शांतता कमिटीच्या बैठकीत गणेशमूर्ती विसर्जनाबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी शांतता कमिटीची बैठक संपल्यानंतर लगेचच त्याबाबत चर्चा केली जाईल असे जाहीर केले. त्यानुसार गणेश विसर्जनाबाबतची  चर्चा  झाली. यावेळी रिसलादार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन होणार नसल्याचे स्पष्ट झाले. यंदा गणेश मूर्ती  विसर्जन गोडोलीच्या तळ्यात करता येईल असे गृहीत धरावे. मात्र तत्पूर्वी सातारा नगरपालिकेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात यंदाचे गणेश विसर्जन मंगळवार व मोती तळ्यात करण्याबाबतची शपथपत्रे दाखल करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.  याबाबतचा वेळीच सकारात्मक निर्णय झाला तर गणेश मूर्ती विसर्जन मंगळवार व मोती तळ्यातच केले जाणार आहे.  पण सुनावणीला वेळ झाला तर गोडोली तळ्यातच विसर्जन केले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, तोपर्यंतच्या कालावधीत सातारा पालिका व पोलिसांनी तिन्ही ठिकाणचे प्लॅनिंग तयार करुन ठेवावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिल्या.

शांतता कमिटीच्या बैठकीला सुरुवात होताच सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी ही बैठक सुरु होण्यापूर्वी गत बैठकीवेळी नागरिकांनी जे मुद्दे मांडले त्यावर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्‍न उपस्थित केला. दरवर्षी बैठकांचा सोपस्कार होतो मात्र त्याची अंमलबजावणी तोकडी असल्याने हे वर्षानुवर्ष सुरु असलेले चक्र आता थांबले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली. यावर नरेंद्र पाटील यांनीही समर्थन देवून सातार्‍यात होणार्‍या अशा बैठकांचे प्रोसिडींग लिहावे, अशी मागणी केली.

सातारकरांच्या या भावना पाहून प्रशासन अक्षरश: हडबडून गेले. गत बैठकांमध्ये नगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले गेल्याचे सांगून आजही अतिक्रमण, बेकायदा व्यवसाय, रस्त्यातील खड्डे हेच विषय ऐरणीवर असल्याचे उपस्थितांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश केले. त्यानुसार गोरे यांनी सातार्‍यातील अतिक्रमण काढलेली ठिकाणी, मोकाट जनावरे, गणेश विसर्जनबाबत सुरु असलेली बोलणी याची उत्तरे दिली. 

यातील कालिदास पेट्रोलपंप येथील रस्ता व गुलबहार हॉटेल परिसरातील एफएसआय हे मुद्दे ऐरणीवर आले. यावर येत्या आठ दिवसांत त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती गोरे यांनी दिली.
दरम्यान, बकरी ईदच्या निमित्ताने चर्चा व्हावी, असा आग्रह प्रशासनाने केल्यानंतर त्याबाबत सर्वांनी बकरी ईदसाठी मुस्लिम बांधवांना सहकार्य केले जाईल. सर्व सण- उत्सव हे आनंदात व गुण्यागोविंदाने साजरे केले जातील, अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक यांनीही बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेवू नये. प्रामुख्याने व्हॉट्सअपवरील माहिती शेअर करताना व ती टाकताना तेढ निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आवाहन करुन तसा गैरप्रकार केल्यास संशयितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी नगरसेवक अशोक मोने, धनंजय जांभळे, विजय काटवटे, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, प्रकाश गवळी, अशोक गायकवाड, शरद काटकर, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह सातार्‍यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.