Thu, Jul 18, 2019 16:55होमपेज › Satara › उपनगरांत बेकायदा नळ कनेक्शनचा सुळसुळाट 

उपनगरांत बेकायदा नळ कनेक्शनचा सुळसुळाट 

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 9:58PMखेड : अजय कदम 

सातारा शहराच्या उपनगरांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अनेक बेकायदा नळ कनेक्शन असल्याचे उघड झाले असून बेकायदा नळ कनेक्शनमुळे प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक ‘गळती’ झाली आहे. नियोजनाचा अभाव, कर्मचार्‍यांचे सटेलोटे  आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे शेकडो नळ कनेक्शन बेकायदेशीरपणे दिली गेली आहेत. ही कनेक्शन शोधून ती कायदेशीर करून घेण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर आहे. त्यासाठी  कर्मचार्‍यांमार्फत  युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्याची मोहीम प्रधिकरणाने राबवली आहे. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सातारा शहराच्या उपनगरांतील खेड, शाहूपुरी, शाहूनगर, खिंडवाडी, संभाजीनगर, विलासपूर, पूर्वेकडील सदरबझार, गोडोली, करंजेपेठचा काही भाग या भागास पाणीपुरवठा केला जातो. या भागाकरिता माहुली येथील कृष्णा नदीमधून पाणी उपसा करून विसावा जलशुद्धीकरण केंद्रातून रोज सुमारे दोन कोटी लिटर शुद्ध पाणी ग्राहकांना पुरविले जाते. गेल्या काही वर्षांत या भागात प्राधिकरणाला कोणतीही माहिती न देता नळ कनेक्शन दिली गेली. या कनेक्शनची प्राधिकरणाच्या दप्तरी नोंद नाही. तर काही नव्याने झालेल्या अपार्टमेंटला तसेच गृह संकुलांना दोन इंचांची कनेक्शन दिली गेली. परंतु, प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांना याबाबत काहीच माहिती

नसल्याचे बोलले जाते. तर उपनगरातील काही नागरिक खाजगीत आपापल्या भागातील बेकायदा कनेक्शनची चर्चा करीत आहेत. मात्र त्यावर कारवाई करण्याचे धाडस प्राधिकरणाने दाखवले नाही. पाणी पुरवठा कनेक्शनची अधिकृत रक्कम भरल्याची पावती दाखवा अन्यथा नळ कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला सामोरे जा, अशी मोहीम राबवल्यास उपनगरातील अनेक बेकायदा नळ कनेक्शन बाहेर येतील. 

अशुद्ध पाणी, शुध्दीकरणाचा खर्च, वीज खर्च, देखभाल दुरुस्ती, कर्मचार्‍यांचे वेतन आणि दुसर्‍या बाजूस पाणी बिलातून मिळणारे उत्पन्न  याचा ताळमेळ पाणी गळती  आणि पाणी चोरीमुळे कुठेच बसत नाही. उत्पन्न आणि खर्चाची तफावत भरून काढताना आपोआप पाणीदरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. बेकायदा नळ कनेक्शनवर प्राधिकरणाने धडक मोहीम राबवून कारवाई केल्यास प्राधिकरणाच्या गळतींपैकी चोरीस  जाणार्‍या पाण्याचे उत्पन्न प्राधिकरणाला मिळणार असून प्राधिकरणाच्या महसुलात काही अंशी तरी वाढ होईल हे निश्‍चित आहे. परंतु यासाठी प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी बेकायदा नळ कनेक्शन शोधून ती अधिकृत करून घेण्यासाठी कर्तव्यतत्परता दाखविणे गरजेचे आहे.